Karnataka Politics: कर्नाटकात 'डीकेएस'पर्व; 'सिध्दा'ही रिंगणात राहणार; काँग्रेसचे 'दक्षिणापथ', '२०२९'चाही बिगुल

DKS Era in Karnataka? कर्नाटकात डी.के. शिवकुमार यांचे महत्त्व वाढत असताना सिद्धरामय्याही राजकीय समीकरणात कायम आहेत. 2029 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस दक्षिण भारतात नवी रणनीती आखत असल्याची चर्चा आहे.
DKS Era in Karnataka
DKS Era in KarnatakaSarkarnama
Published on
Updated on

देशातील २९ पैकी तब्बल १४ राज्यांत स्वबळावर, तर सहा राज्यांत मित्रपक्षांच्या साथीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेवर आहे. अशा बलाढ्य भाजपला तोंड देण्यासाठी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने कंबर कसली आहे.

काँग्रेसच्या ताब्यातील सर्वात मोठे राज्य असलेल्या कर्नाटकात नुकताच मुख्यमंत्रीपदावर डी के शिवकुमार या दबंग व वोक्कलिंग या राज्यातील दुसऱ्या महत्वाच्या समाजाच्या नेत्याची निवड करत दक्षिणेत आपल्या पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे.

खरं पाहता सिद्धरामय्या यांच्या लोकप्रिय अशा राजकीय वाटचालीला ब्रेक देण्याचे काही कारण नव्हते. मात्र २०२३ च्या निवडणुकीत पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी मेहनत केलेल्या व दबंग राजकारणी अशी प्रतिमा बनवलेल्या डी के शिवकुमार यांचे नाव त्यावेळेपासून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते व त्यानंतरही अनेकदा राज्यात या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून आपलाच नेता मुख्यमंत्रीपदावर असावा, असे दावे केले जायचे.

आता केरळसह पाच राज्यातील निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यावर पक्षाने उर्वरित दोन वर्षांच्या कालावधीसाठी व भविष्यातही राज्यात काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी शिवकुमार यांच्यावर विश्वास टाकला आहे. सिद्धरामय्या या मासलिडर असलेल्या नेत्याला मात्र आपली खुर्ची सोडावी लागत आहे. हा सत्ताबदल काँग्रेसच्या नेहमीच्या पद्धतीने न होता अगदी सुकर पद्धतीने व सामोपचाराने झाल्याने एका वेगळ्या काँग्रेस संस्कृतीचे दर्शन देशाला झाले आहे. तर भाजप व समर्थकांच्या गोटातून त्यावर टीका केली जात आहे. खरं पाहिलं तर पक्षाचा हा अंतर्गत मामला आहे.

शिवकुमार ताकदीचा नेता...

कर्नाटकातील शिवकुमार हे अगदी ताकदीचे नेते आहेत. ते काँग्रेसचे कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ईडीने त्यांना मनि लॉड्रिंग प्रकरणात तुरुंगात ठेवल्यानंतर सोनिया गांधी त्यांना भेटायला गेल्या होत्या. यातच त्यांचे महत्त्व लक्षात येते. पक्षात त्यांची ट्रबलशूटर व धाडसी नेता अशी प्रतिमा आहे. महाराष्ट्रातील तत्कालीन विलासराव देशमुख यांचे सरकार वाचविण्यासाठी व गुजरातमध्ये अहमद पटेल यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा करण्यासाठी त्यांनी प्रमुख भुमिका बजावली होती. तेलंगणात रेवंत रेड्डींच्या सत्तारोहणातही ते सक्रिय होते. एनएसयूआयमध्ये वयाच्या केवळ अठराव्या वर्षी त्यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर युवक काँग्रेस मार्गाने आज मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास. कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री व माजी पंतप्रधान देवेगौडा या वोक्कलिंग समाजातील प्रभावशाली राजकीय नेत्याशी दोन हात करत शिवकुमार यांनी आपले राजकीय साम्राज्य उभे केले आहे.

DKS Era in Karnataka
Santosh Dehsmukh Case: 'धनंजय देशमुखांसोबत राहू नकोस, संतोष देशमुख प्रकरणात साक्ष देऊ नको; दादा खिंडकरला सख्ख्या भावाकडूनच धमकी!

१९८५ च्या साथनूर विधानसभा निवडणुकीत ते थेट देवेगौडा यांच्याविरोधात लढले होते. तिथूनच या एकाच समाजातील दोन नेत्यांत राजकीय स्पर्धा सुरू झाली. त्यानंतर त्यांनी याच मतदारसंघातून १९८९ च्या पोटनिवडणुकीत पहिला विजय मिळवला व बस्तान मांडले. त्यानंतर १९९४, १९९९, २००४ ची निवडणूक ते इथूनच जिंकले.

विशेष म्हणजे १९९९ च्या निवडणुकीत त्यांनी एचडी कुमारस्वामी यांचा पराभव करत देवेगौडांनी केलेल्या पराभवाचे उट्टे काढले होते. २००८ ला मतदारसंघ फेररचनेनंतर त्यांचा साथनूर हा मतदारसंघ संपुष्टात आला. मग त्यांनी कनकपुरातून २००८, २०१३, २०१८ व २०२३ ची निवडणूक जिंकली. २०२३ ला ते तब्बल एक लाख बावीस हजार मतांनी निवडून आले. तब्बल आठ वेळा ते साथनूर व कनकपुरातून निवडून आले आहेत. देशभरात काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागत असताना शिवकुमारसारखा नेत्याला बळ देणे, ही पक्षाचीही गरज होती.

DKS Era in Karnataka
Toxic Liquor Tragedy in Pune: मध्यरात्री एका झटक्यात तब्बल 21 अधिकारी निलंबित; CM फडणवीसांच्या आदेशानंतर मोठी कारवाई

सिद्धरामय्याची माघार‌

काँग्रेस पक्षनेत्यांच्या आदेशाने पायउतार झालेल्या सिद्धरामय्या यांनी राजीनामा देताना केलेल्या भावना अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यांनी पक्षाने दिलेली राज्यसभेची ऑफर नाकारत राजकारणात सक्रिय राहणार असल्याचा निर्धार केला. सर्वाधिक काळ कर्नाटकाचा मुख्यमंत्री असे बिरुद लागलेल्या या नेत्याने आपल्या यशाचे सगळे श्रेय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिले.

"मी खेड्यातून आलेलो. कधी मुख्यमंत्री होईल, असे स्वप्नही पाहिले नव्हते. पण मी एकेदिवशी मुख्यमंत्री झालो. विरोधी पक्षनेता ही झालो.‌ माझ्या घरात कुणीही राजकारणात नव्हते. मी मात्र आलो. मी बुद्धाला मानतो. मी बसवण्णा, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या विचारांना मानतो. मी संविधान मानतो. संपूर्ण समाजात समानता निर्माण व्हावी, आर्थिक व सामाजिक समानता नांदावी, यासाठी मी कार्यरत राहणार," असा विश्वास व विचार देणारा हा नेता.

'युनिटी इज अवर स्ट्रेंन्थ' असा संदेश देत सिद्धरामय्या व शिवकुमार यांनी या बदलाचे स्वागत केले. शिवकुमार हे आशिर्वादासाठी सिद्धरामय्या यांच्या पाया पडले.

सिद्धरामय्या यांचा राजकीय प्रवास पाहिला तर या नेत्याच्या पाठी किती मोठा अनुभव आहे हे लक्षात येते.वकिलीचे शिक्षण घेतलेल्या या नेत्याने देवराज अर्स यांचा मुख्यमंत्री पदाच्या काळाचा विक्रम मोडला आहे. ते सध्या (२०२३) वरुणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. १९८३, १९९४, २००४ ला ते चामुंडेश्वरी मतदार संघातून निवडून आले. २००८ ला बदामी व २०१८ पासून ते वरुणातून ते निवडून येत आहेत. १९९६ ते १९९९ व २००४ ते २००५ असे दोन वेळा उपमुख्यमंत्री राहिले.

या काळात ते जनता दल व जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षांत होते. कुरबा या इतर मागासवर्गीय जातीतून शेतकरी कुटुंबात ते जन्माला आले. १९८५ ला जनता पक्षाचे तत्कालीन मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांच्या मंत्रिमंडळात ते पशुसंवर्धन मंत्री बनले. १९८९ ला ते प्रसिद्ध कॉंग्रेस नेते राजशेखर मूर्तींकडून पराभूत झाले. १९९४ ला पुन्हा जिंकले व देवेगौडा यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री झाले.

१९९६ ला जे एच पटेल यांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर जनता दलाच्या विभाजनानंतर राज्यात देवेगौडा यांच्या जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष बनले. मात्र १९९९ च्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. २००५ ला देवेगौडा यांच्याशी मतभेद झाल्याने ते पक्षाबाहेर पडले व काँग्रेस पक्षात गेले. या पक्षप्रवेश सोहळ्यास सोनिया गांधी उपस्थित होत्या. लोकदल, जनता पक्ष, जनता दल, जनता दल धर्मनिरपेक्ष व आता काँग्रेस असा त्यांचा दीर्घ व अनुभवी राजकीय प्रवास राहिला आहे. या काळात ते दोन वेळा मुख्यमंत्री, दोन वेळा उपमुख्यमंत्री व दोन वेळा विरोधी पक्षनेते राहिले. त्यांनी अनेक पक्षबदल केले असले तरी समाजवाद व धर्मनिरपेक्षता व संविधान मूल्ये ही त्यांची राजकीय विचारधारा राहिली आहे. तिच्याशी संलग्न राहत हिंदुत्व व मूलतत्त्ववादाविरोधात सातत्याने लढण्याचा निर्धार त्यांनी राजीनामा देतानाही केला आहे.

मजबूत नेत्यांवर काँग्रेसची मदार

नियोजित मुख्यमंत्री डीकेएस, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व संभाव्य प्रदेशाध्यक्ष सतीश जारकीहोळी हे तीन तगडे नेते ही काँग्रेसची कर्नाटकातील ताकद आहे. तिन्ही वेगवेगळ्या समाजांचे प्रतिनिधित्व करतात. आगामी काळात दक्षिणेत व कर्नाटकात काँग्रेसला मजबूत करणारी त्रिमूर्ती अशा नजरेतून या तिघांकडे पाहिले जाणार आहे.काँग्रेसच्या २०२९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणूनही या घडामोडींकडे पाहायला हरकत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com