

Karnataka News : कर्नाटक राज्यात नुकताच मुख्यमंत्री बदलला असून डी.के. शिवकुमार नवे मुख्यमंत्री झाले आहेत. यानंतर आता राज्यात नवे बदल केले जात असून आता सीमाभागातील विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत परिवहनमंत्री बी. एस. सुरेश बैराती यांनी घोषणा केली असून राज्यातील विद्यार्थी मुलांसाठी मोफत बसपास योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच याआधी ज्यांनी पास घेतला आहे त्यांनी पैसे परत केले जाणार आहेत. तर या योजनेत सीमाभागातील विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आहे. यामुळे महाराष्ट्रासह सीमाभागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
परिवहनमंत्री बी. एस. सुरेश बैराती यांनी, राज्यातील विद्यार्थी मुलांसाठी ‘शक्ती’ योजनेअंतर्गत मोफत बस प्रवासाची घोषणा करण्यात आल्याचे सांगितले. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी आवश्यक शुल्क भरून आधीच बस पास घेतले आहेत, त्यांचेही पैसे परत (रिफंड) मिळतील, अशी घोषणा केली. तर ही मोफत बस पास योजना एक-दोन दिवसांत सुरू होणार असल्याचे सांगत या योजनेसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली असून, ती लवकरच जारी केली जातील, असेही त्यांनी नमूद केले आहे.
सध्या, ‘शक्ती’ योजनेअंतर्गत केवळ विद्यार्थिनींनाच सरकारी बसेसमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र शिवकुमार यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला आणि ३ जून रोजी मुलांसाठीही ही योजना जाहीर केली. यापूर्वी विद्यार्थी बसपास योजनेत एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम सरकार, २५ टक्के रक्कम परिवहन महामंडळे आणि उर्वरित २५ टक्के रक्कम विद्यार्थी भरत होते. आता विद्यार्थ्यांचा हा आर्थिक भार पूर्णपणे दूर करण्यात आला आहे.
या प्रमाणे आता विद्यार्थी पुढील काही दिवसांत ‘कर्नाटक-वन’, ‘बंगळूर-वन’ आणि ‘ग्राम-वन’ केंद्रांवर अर्ज करू शकतात. अर्जांची पडताळणी केल्यानंतर मोफत बस पास देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. तर बसपासचे दर ३०० रुपये ते १, २०० रुपये दरम्यान असणार आहे. तर या योजनेसाठी ‘सेवासिंधू’ पोर्टलमध्ये ऑनलाईनद्वारे अर्ज करावा करावा लागणार आहे. तर आधी बसपास घेतलेल्या विद्यार्थ्यांचा जूना बसपास ग्राह्य धरून येत्या १५ दिवसांत रक्कम परत केली जाणार आहे.
दरम्यान आता या मोफत बससेवेचा लाभ कर्नाटकात वास्तव्यास असलेल्या आणि शेजारील राज्यांतील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. तसेच सीमाभागातील इतर राज्यांमध्ये राहून कर्नाटकातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भातील आदेश जारी करून मोफत बसपास योजनेची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आला आहे. यामुळे सीमाभागासह इतर राज्यातील लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.