

Kerala News : केरळ विधानसभा निवडणुकीत विजय मिळूनही पुन्हा एकदा काँग्रेसमधील संघर्षानं डोकं वर काढलं आहे. निकालाला दहा दिवस उलटूनही काँग्रेस पक्षाकडून अद्याप मुख्यमंत्री पदासाठी अंतिम नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. वरिष्ठ नेते के.सी.वेणुगोपाल,रमेश चेन्निथला आणि व्ही.डी.सतीशन यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं समोर येत आहे. यातच आता केरळमध्ये हायकमांडच्या मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दाखवलेल्या नेत्याच्या नावालाच काँग्रेसमधूनच तीव्र विरोध होताना दिसून येत आहे.त्यामुळे काँग्रैस नेतृत्वासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
दिल्लीत केरळच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात मॅरेथॉन बैठका सुरू आहे. त्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी स्वतः या केरळच्या मुख्यमंत्री पदावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे. पण काँग्रेसच्या हायकमांडने ग्रीन सिग्नल दाखवलेल्या के सी वेणूगोपाल यांच्या नावाला पक्षातंर्गतच मोठा विरोध केला जात आहे.
केरळच्या मुख्यमंत्री पदासाठी सध्या काँग्रेसकडून के. सी. वेणुगोपाल यांच्यासह व्ही.डी.सतीशन आणि रमेश चेन्निथला असे तीन नावं आघाडीवर आहे. त्यात के सी वेणूगोपालराव हे काँग्रेस हायकमांडच्या अत्यंत जवळचे मानले जातात. तर ते व्ही.डी.सतीशन हे एक अनुभवी तसेच आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. चेन्निथला यांना केरळ काँग्रेसचा प्रमुख चेहरा मानलं जातं.
पण या तीनही मातब्बर नेत्यांमुळे केरळच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटत नसल्याचं दिसून येत आहे. एकीकडे कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावरुन सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यातील संघर्षाची धग दिल्लीपर्यंत पोहोचली असतानाच केरळमध्येही नवा वाद उफाळून आला आहे.
यापूर्वी राजस्थानमध्ये अशोककुमार गेहलोत-सचिन पायलट, छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल- टी.एस.सिंह देव, मध्य प्रदेशात कमलनाथ- ज्योतिरादित्य शिंदे, तर पंजाबमध्ये अमरिंदर सिंग-नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन मोठा संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळालं होतं. यात काँग्रेसला मध्य प्रदेश, राजस्थान,पंजाब या तीनही राज्यात सत्ता गमवावी लागली होती.
केरळ विधानसभा निवडणुकीचे 4 मे रोजी निकाल लागल्यानंतरही अद्यापही मुख्यमंत्री चेहरा ठरवण्यात काँग्रेसला अपयश आल्याचं दिसून येत आहे. आता या वादाचा मोठा भडका उडाला असून वायनाडमध्ये थेट खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्याविरोधातच पोस्टर झळकले आहेत. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेसनं केरळच्या मुख्यमंत्रीपदी के. सी. वेणुगोपाल यांची निवड केली, तर वायनाडचं अमेठी होईल, असा इशारा देत संबंधित पोस्टर्समधून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्वाची एकप्रकारे कोंडीच केल्याचं दिसून येत आहे. यात वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांच्याहीविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.