Kolkata : कोलकाता रेप-मर्डर प्रकरणाने पश्चिम बंगालमध्ये दररोज उद्रेक होत असल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील दबाव वाढत चालला आहे. प्रामुख्याने भाजपने या प्रकरणावरून ममता सरकारला पुरते घेरले आहे. त्यानंतर ममतांनी आता दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवत या घटना रोखण्यासाठी महत्वाचे विधेयक पारित करण्याचा निर्णय घेतला आहे.
ममतांनी काही दिवसांपूर्वी बलात्कारविरोधी कायदा करण्याचे जाहीर केले होते. हा कायदा अत्यंत कठोर असेल. बलात्काराच्या घटनेनंतर आरोपीला दहा दिवसांत मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल, अशी तरतूद या कायद्यात असेल, अशी चर्चा आहे. सोमवारपासून सुरू होत असलेल्या अधिवेशन हे विधेयक सादर केले जाईल.
घटनेनंतर सातत्याने ममतांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपकडून या विधेयकाला पाठिंबा दिला जाणार आहे. त्यामुळे हे विधेयक सर्वसंमती पारित होण्याची शक्यता आहे. विधानसभेत नेहमीच भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांमध्ये खडाजंगी होत असते. मात्र, या विधेयकाच्या निमित्ताने भाजप पहिल्यांदाच ममतांच्या निर्णयाला पाठिंबा देणार आहे. मंगळवारी विधेयक संमत होऊन मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवले जाईल.
विधेयकावर सोमवारी दुपारनंतर चर्चा होणार असल्याचे समजते. या चर्चेदरम्यान भाजपकडून ममता सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जाऊ शकतो. भाजपकडून ममतांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जाईल, अशी शक्यता आहे.
दरम्यान, कोलकाता रेप घटनेची चौकशी सीबीआयकडून केली जात आहे. प्रमुख आरोपीला अटक करण्यात आली असून सीबीआयकडून इतरांचीही चौकशी केली जात आहे. ही सामुहिक बलात्काराची घटना नसल्याचीही प्राथमिक माहिती आहे. असे असले तरी घटनेनंतर रुग्णालय प्रशासन, पोलिसांनी केलेल्या दिरंगाई आणि निष्काळजीपणावरून ममता सरकारला टार्गेट केले जात आहे.
पोलिसांनी दबावाखाली हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. बंगालमध्ये दररोज मोर्चे, आंदोलन होत असून डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरजी कार रुग्णालयात सीआयएसएफचे जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.