

महाराष्ट्राच्या जालना जिल्ह्यातून IAS अधिकारी बनलेल्या अंसार शेख यांची सध्या अंमलबजावणी संचालनालय अर्थात ED कडून चौकशी सुरू आहे. पश्चिम बंगालमधील कथित अवैध वाळू उत्खनन आणि तस्करीशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या तपासात अंसार शेख यांचे नाव समोर आले आहे. या प्रकरणी ED ने त्यांना चौकशीसाठी दोन वेळा साल्ट लेक येथील CGO कॉम्प्लेक्समध्ये बोलावल्याची माहिती आहे.
झारग्राम जिल्हा आणि आसपासच्या भागातील नदीपात्रातून कथित बेकायदेशीर वाळू उत्खनन आणि तस्करीच्या प्रकरणाचा ED कडून तपास केला जात आहे. या तपासादरम्यान कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेबाबत अंसार शेख यांची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
अंसार शेख यांचा जन्म 1 जून 1994 रोजी महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील शेलगाव येथे झाला. मराठवाड्यातील आर्थिक अडचणी आणि दुष्काळाच्या परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील युनूस शेख अहमद ऑटो रिक्षा चालवत होते, तर आई अदीला शेख शेतमजुरी करत होत्या.
अंसार यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांच्या दोन बहिणींचे कमी वयातच लग्न झाले. तर त्यांचा धाकटा भाऊ अनीस याने सातवीतच शिक्षण सोडून गॅरेजमध्ये काम करण्यास सुरुवात केली. कुटुंबाचा खर्च आणि अंसार यांच्या शिक्षणासाठी त्याने हातभार लावला.
आर्थिक अडचणी असतानाही अंसार यांनी शिक्षणात सातत्य ठेवले. 12वीच्या बोर्ड परीक्षेत त्यांनी 91 टक्के गुण मिळवले. त्यानंतर पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमधून राज्यशास्त्र विषयात पदवी घेतली आणि 73 टक्के गुण मिळवले. पदवीच्या शिक्षणादरम्यानच त्यांचा कल UPSC नागरी सेवा परीक्षेकडे वाढला. देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेची त्यांनी सलग 3 वर्षे तयारी केली.
अंसार शेख यांनी UPSC परीक्षेसाठी दररोज साधारण 12 तास अभ्यास केला. काही दिवस हा अभ्यासाचा कालावधी 14 ते 15 तासांपर्यंत पोहोचत असे.
2016 मध्ये अंसार शेख यांच्या मेहनतीला मोठे यश मिळाले. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि ऑल इंडिया रँक 361 मिळवला. त्यावेळी 21 व्या वर्षी IAS अधिकारी बनून ते देशातील सर्वात कमी वयाचे IAS अधिकारी ठरल्याचे सांगितले जाते. त्यांना 2016 बॅच अंतर्गत पश्चिम बंगाल कॅडर मिळाले.
महाराष्ट्रातील जालना ते पश्चिम बंगालमधील प्रशासनातील महत्त्वाची जबाबदारी असा अंसार शेख यांचा प्रवास राहिला आहे. मात्र, आता कथित अवैध वाळू उत्खनन आणि आर्थिक व्यवहारांच्या तपासामुळे त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील ED चौकशीमुळे पश्चिम बंगालच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळातही लक्ष वेधले गेले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.