Kolhapur Maratha Reservation News : मनोज जरांगे-पाटील यांच्याकडून राज्य सरकारला दिलेला अल्टीमेटम रविवारी संपणार आहे. मात्र राज्य सरकारकडून अजूनही मराठा समाजाची दिशाभूलच सुरू आहे. सोमवारनंतर मनोज जरांगे-पाटील यांनी घोषणा केल्यानंतर मराठा समाज बांधव मुंबईला धडकणार आहे. त्यावेळचे आंदोलन पेलणार नाही, अशा शब्दात कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने राज्य सरकारला इशारा दिला आहे. (Latest Marathi News)
ऐतिहासिक दसरा चौकात 54 दिवस समाजातर्फे आंदोलन सुरू आहे. राज्यभरातील विविध ठिकाणीही आंदोलने सुरू आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत कोणताच निर्णय झाला नाही. उलट समाजाची दिशाभूल करणारी वक्तव्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. 24 डिसेंबर ही सरकारला दिलेली शेवटची मुदत आहे. मात्र, फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. सरसकट कुणबी दाखले देणार नाही आणि राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर अधिवेशन घेऊ, असेही त्यांनी सांगितले आहे. मात्र, अहवाल नेमका कधी येणार, याबाबत स्पष्टता नाही.
सरसकट दाखले दिले नाहीत तर कुणबी नोंदी नसलेल्या समाजावर अन्याय होणार आहे. ‘ईडब्ल्यूएस’चा पर्यायही दिशाभूल करणाराच असल्याने आता आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. निवडणुकीपर्यंत चालढकल एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका जाहीर होतील आचारसंहिता लागली की सरकारला पुन्हा कारण मिळणार आहे. त्यामुळे तोपर्यंत निर्णय घेण्यात जाणीवपूर्वक चालढकल केली जात आहे.
राज्य सरकार 10 टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देणार, असे सांगितले जात असले तरी त्यासाठी घटनेत दुरुस्ती करावी लागेल आणि तो अधिकार राज्य शासनाला नाही. आजपर्यंत किती कुणबी नोंदी सापडल्या, याची माहितीही सरकार देत नाही. आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षांनी चार निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक केली आहे. असे असेल तर मुख्यमंत्री जी भूमिका मांडतात ती या सर्वांचीच भूमिका आहे का, असाही सवाल निर्माण होत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
‘ओबीसी’तून मराठा आरक्षण मिळावे, ही आंदोलनाची मागणी आहे. त्यामुळे या दोन समाजात कशी तेढ निर्माण होईल, असा जाणीवपूर्वक प्रयत्न होऊ लागला आहे. मात्र, कोल्हापूरचा विचार केला तर असा कुठलाही वाद दोन्ही समाजांत होणार नाही. उलट ओबीसी समाजाने मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काहीही झाले तरी हा सलोखा कायम राहणार आहे, असेही आवर्जुन सांगितले.
यावेळी ॲड. बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, वसंतराव मुळीक, विजय देवणे, संभाजीराव जगदाळे आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.