

Rajasthan News: ग्रामपंचायतपासून ते विधानसभा,लोकसभा अशा कोणत्याही निवडणुकीत उमेदवारांसाठी एक एक मत महत्त्वाचे असते. एका मतामुळे कित्येक निवडणुकीत उमेदवारांना पराभव आणि निसटता विजय मिळाल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. त्याचमुळे एका एका मतासाठी उमेदवार निवडणुकीत आपली सर्व ताकद पणाला लावतात. अवघ्या एका मतानं निवडणूक जिंकलेल्या उमेदवारानं विजयाचा गुलाल उधळण्याआधीच आईला गमावलं. पण आईनं देवाघरी जाण्याआधी लेकाच्या गळ्यात विजयाची माळ घातल्याची भावनिक चर्चा सुरू आहे.
राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यात असलेल्या नदबई नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मधून जगदीश प्रसाद विजयी झाले. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजप उमेदवाराचा अवघ्या एका मतानं पराभव केला. त्यांच्या याच विजयाची चर्चा संपूर्ण राज्यभर जोरदारपणे सुरू आहे. कारण त्यांनी मिळवलेल्या विजयात त्यांच्या दिवंगत आईचाच मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी एका या पोटनिवडणुकीत अवघ्या एका मतानं बाजी पलटवली.
नदबई नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये पार पडलेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार जगदीश प्रसाद यांनी 151 मतं मिळवली, तर भाजप उमेदवार रामशरण यांना 150 मते मिळाली. दोन्ही उमेदवारांच्या जय-पराजयात अवघ्या एकाच मताचं अंतर राहिल्यानं हा निकाल चर्चेचा विषय ठरला आहे.
मात्र, अपक्ष उमेदवार जगदीश प्रसाद यांच्या विजयाला एक दु:खद आणि तितकीच भावनिक किनारसुध्दा आहे. निवडणुकीच्या दिवशी त्यांच्या आईनं मतदानाचा हक्क बजावला. आणि निकालाच्या दिवशीच त्यांच्या आईनं जगाचा निरोप घेतला.
त्यांनी निधनाच्या आदल्यादिवशी लेक उभा असलेल्या निवडणुकीत बजावलेला मतदानाचा हक्क आणि दुसर्या दिवशी निकालात एकाच मतानं जगदीश प्रसाद यांचा विजय होणं हा योगायोगच म्हणण्यासारखं आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर स्थानिकांमध्ये जगदीश प्रसाद यांच्या आईने दिलेल्या त्या मतामुळेच निवडणुकीचा कौल बदलल्याची चर्चा आहे.
जगदीश प्रसाद यांच्या आईने दिलेले मतदान त्यांच्या कुटुंबीय आणि स्थानिकांसाठी भावनिक ठरले आहे. एकीकडे आईच्या निधनाचे दुःख आणि दुसरीकडे जगदीश प्रसाद यांच्या विजयाची बातमी, अशा संमिश्र भावनांमधून कुटुंबाला सामोरे जावे लागले. अवघ्या एका मताने मिळालेल्या विजयामुळे या घटनाक्रमाला आणखी भावनिक स्वरूप प्राप्त झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.