

आजपासून देशभरात अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि प्रशासकीय नियम लागू झाले आहेत. या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन खर्चावर आणि आर्थिक व्यवहारांवर होणार आहे. एलपीजी कनेक्शन, यूपीआय व्यवहार, एटीएम वापर, पॅन कार्ड, आधार अपडेट तसेच सोलर पॅनल आणि हवाई प्रवासाशी संबंधित नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
घरगुती गॅस वापरासंदर्भात सरकारने नवीन अटी लागू केल्या आहेत. आता एका पत्त्यावर फक्त एकच सक्रिय गॅस कनेक्शन ठेवण्यास परवानगी असेल. ज्या घरांमध्ये पीएनजी सुविधा सुरू आहे, त्यांना एलपीजी सिलेंडरचा पर्याय ठेवता येणार नाही. दोन्ही सुविधा वापरत असल्यास एलपीजी कनेक्शन परत करावे लागेल. अन्यथा संबंधित तेल कंपन्या कनेक्शन बंद करण्याची कारवाई करू शकतात.
डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी यूपीआय प्रणालीतही सुधारणा करण्यात आली आहे. आता पैसे पाठवताना लाभार्थ्याचे बँकेत नोंद असलेले खरे नावच स्क्रीनवर दिसणार आहे. त्यामुळे बनावट नावांच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीवर आळा बसण्याची अपेक्षा आहे.
बँकिंग क्षेत्रातही महत्त्वाचे बदल झाले आहेत. यूपीआयद्वारे एटीएममधून रोख रक्कम काढल्यास तीही मोफत व्यवहारांच्या मर्यादेत गणली जाणार आहे. निर्धारित 5 मोफत व्यवहार पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी शुल्क आकारले जाईल.
मोठ्या आर्थिक व्यवहारांवर देखरेख वाढवण्यासाठी पॅन कार्डचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख जमा किंवा पैसे काढताना पॅन कार्ड देणे अनिवार्य राहील. तसेच 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्ता व्यवहारांसाठी आणि 5 लाख रुपयांपेक्षा महाग वाहन खरेदीसाठीही पॅन आवश्यक असेल. नव्या विमा पॉलिसीसाठीदेखील पॅन कार्डची अट लागू करण्यात आली आहे.
आधार कार्डमधील नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा इतर माहिती अद्ययावत करण्यासाठी आता 75 ते 125 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. मात्र 14 जून 2026 पर्यंत ऑनलाइन दस्तावेज अपडेटची सुविधा विनामूल्य उपलब्ध राहणार आहे.
याशिवाय, सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारमान्य उपकरणांचाच वापर बंधनकारक करण्यात आला आहे. त्यामुळे सौर ऊर्जा प्रकल्पांच्या खर्चात 3,000 ते 9,000 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे विमान इंधनाच्या वाढत्या किमती आणि मागणीत झालेल्या बदलांमुळे काही विमान कंपन्यांनी देशांतर्गत उड्डाणांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी हवाई प्रवासाचा खर्च वाढण्याची शक्यता असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी उड्डाणांची स्थिती तपासून घेणे आवश्यक ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.