सोल : सैन्याच्या सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यासाठी भव्यदिव्य परेड महागात पडल्याचे चित्र उत्तर कोरियात आहे. कारण ही परेड सुपरस्प्रेडर ठरली असून, तिने संपूर्ण देशभरात कोरोना पोचवला आहे. या परेडमुळं आता लाखो जण विलगीकरणात आहेत. सैन्याच्या स्थापना दिवसानिमित्त एप्रिल महिन्याच्या अखेरीस ही परेड झाली होती.
कोरियाची राजधानी प्योंगाँगमध्ये २५ एप्रिलला परेड झाली होती. या परेडला हजारो नागरिक उपस्थित होते. या परेडमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले नव्हते आणि कुणी मास्कही घातलेले नव्हते. या परेडनंतर देशभरात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. शेजारील चीनमध्ये ओमिक्रॉनचा कहर सुरू असताना ही परेड घेणं आता कोरियाला चांगलंच महागात पडलं आहे. ही परेड सुपरस्प्रेडर ठरल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. देशभरात सुमारे साडेतीन लाख नागरिकांना कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. त्यातील सुमारे 1 लाख 87 हजार जण विलगीकरणात आहेत.
उत्तर कोरियात कोरोनाचा (Covid-19) पहिला रुग्ण आढळल्याची सरकारने काल (ता.12) कबुली दिली होती. यानंतर कोरोना विषाणूचे उच्चाटन करण्यासाठी अध्यक्ष किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी देशात आणीबाणी घोषित केली आहे. यानंतर आता कोरोनामुळे पहिला बळी गेल्याची माहिती कोरियाने दिली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत उत्तर कोरियात कोरोना संसर्ग झाल्याचे सरकारने मान्य केले नव्हते. देशात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसल्याचा दावा कोरियाकडून केला जात होता. नंतर कोरिया सरकारने देशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याची कबुली दिली. यानंतर देशभरात कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत.
जगभरात कोरोनाची साथ 2020 पासून सुरू झाल्यानंतर कोरियाच्या सीमांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार प्योगाँगमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. या रुग्णाला ताप आला होता. वैद्यकीय तपासणीत त्याला कोरोनाच्या ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, उत्तर कोरियात याआधीही कोरोनाचा संसर्ग झाल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु, कोरिया सरकारने त्यावेळी हे दावे फेटाळून लावले होते.
कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर सरकारने युद्ध पातळीवर पावले उचलली आहेत. किम जोंग यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठक घेण्यात आली. या बैठकीत कोरोनाचे संकट रोखण्यासाठी देशभरात आणीबाणीची घोषणा करण्यात आली. कोरोना रोखण्यासाठी कठोर आणीबाणी लागू करण्याचे बैठकीत सांगण्यात आले. अतिशय कमी कालावधीत कोरोनाचे समूळ नष्ट करण्याचे ध्येय असल्याचे किम यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या संकटातून देश बाहेर पडेल, असा विश्वासही किम यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.