

पुणे : 92 नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षणबाबत निकालबाबत त्वरीत घेण्याबाबत विनंती करणाऱ्या प्रलंबित याचिकेवर सोमवारी दि. 5 डिसेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र आता याची सुनावणी आणखी लांबणीवर पडली आहे. याप्रकरणी आता 13 डिसेंबर रोजी सुनवाणी पार पडणार आहे.
2021 मध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यसंख्येत वाढ केली होती. 92 नगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना, आरक्षण तसेच मतदार यादीची कार्यवाही वाढीव सदस्य संख्येच्या आधारावरच पूर्ण केली होती. मात्र 4 ऑगस्ट 2022 रोजीच्या अध्यादेशान्वये सदस्य संख्येत केलेली वाढ व निवडणूक आयोगाने केलेली प्रभाग रचना आरक्षण तसेच मतदार यादीची कार्यवाही राज्य शासनाने रद्द केली. त्यामुळे या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.
ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका राहुल रमेश वाघ व इतरांनी केल्या, त्याचप्रमाणे शासनाच्या 4 ऑगस्टच्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिका पवन शिंदे व इतरांनी सादर केल्या आहेत. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशान्वये राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची सर्व प्रक्रिया पार पाडली असल्याने राज्य शासनाला आता अध्यादेश जारी करुन किंवा कायदा करून ती प्रक्रिया निरस्त करण्याचा अधिकार नाही, त्याचप्रमाणे मुदत संपण्याच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्याचा दंडक संविधानात घालून दिलेला आहे, इत्यादी मुद्दे याचिकांमध्ये उपस्थित करण्यात आलेले आहेत.
राज्य सरकारच्या अध्यादेशाने व नवीन कायद्याने निवडणुकीची प्रक्रिया अनिश्चित काळासाठी प्रलंबित होणार असल्याने, अध्यादेश व कायद्यास स्थगिती देऊन यापूर्वी केलेल्या कार्यवाहीच्या आधारे राज्य निवडणूक आयोगास त्वरित निवडणूक घेण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. राज्य शासनाने 4 ऑगस्टच्या आदेशान्वये आयोगाने केलेली संपूर्ण प्रक्रिया निरस्त केलेली असल्याने आता सर्व प्रक्रिया नव्याने करावी लागेल.
या सर्व प्रकरणावर सोमवार दि. 5 डिसेंबर रोजी सुनवाणी होणार होती, मात्र इतर अनेक प्रकरणे न्यायालयाच्या पटलावर असल्याने, आता 92 नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण आणि महाराष्ट्रातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात आता 13 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.