

Narendra Modi News: लोकसभेत शुक्रवारी(ता.17) विरोधकांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे 12 वर्षांच्या सत्तापर्वात पहिल्यांदाच मोदी सरकारला एखादं विधेयक नामंजूर होण्याचा धक्का सहन करावा लागला. केंद्रातील सरकारनं आणलेल्या महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना संबंधित 131 वे घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी(ता.18)रात्री देशवासियांना संबोधित करत आपली भूमिका मांडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले, देशातील कोट्यवधी महिलांची नजर संसदेकडे होती.पण ज्यावेळी महिलांच्या हितसंबंधीचा प्रस्ताव संसदेत उपस्थित करण्यात आला.त्यावेळी देशातील महिला पाहत होत्या की, हा प्रस्ताव मंजूर न झाल्यानंतर काँग्रेस,डीएमके,टीएमसी,सपा यांसारखे पक्ष आनंदानं टाळ्या वाजवत होते. या पक्षांनी या कृतीतून जे केले ते महिलांच्या सन्मानावर आघात होता असंही मोदी म्हणाले.
तसेच महिला सगळं विसरतात, परंतु त्यांचा अपमान कधीच विसरत नाहीत.त्यामुळे भविष्यात काँग्रेस तसेच इतर पक्षांची भूमिका प्रत्येक महिलेच्या मनात कायम राहणार आहे. ज्या ज्या पक्षांनी महिलांच्या आरक्षणामध्ये अडथळे आणले त्यांना भविष्यात परिणाम भोगावे लागणार असल्याचा इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदींनी जेव्हा-जेव्हा या नेत्यांना पाहतील, तेव्हा-तेव्हा महिलांना या पक्षांची भूमिका आठवणार आहे, असं सांगत मोदींनी विरोधकांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
विरोधकांनी महिला आरक्षण तसेच मतदारसंघ फेररचना विधेयकांत अडथळे आणत एकप्रकारे देशाच्या महिला शक्तीच्या इच्छांनाच रोखलं, त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर करण्यात आला. आमच्यासाठी देशहित सर्वात प्रथम,तर काही लोकांसाठी पक्षहित हे सर्वात मोठं होतं.त्याच्यामुळे देशातील महिलांना त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. काँग्रेसच्या अशा स्वार्थी निर्णयामुळे यापूर्वीही अनेकदा महिलांना दु:खं झेलावं लागल्याची टीकाही मोदींनी यावेळी केली.
मोदी म्हणाले, नारीशक्ती वंदन विधेयकाला ज्या लोकांनी विरोध केला,त्यांनी महिलांना गृहीत धरण्याची चूक केली.पण आता देशभरातील महिलांना विरोधकांची भूमिका लक्षात आली आहे. या पक्षांना त्यांच्या पापाची शिक्षा नक्कीच मिळणार आहे.महिलांकडून याचा बदला घेतला जाईल. हे नारीशक्ती वंदन बिल प्रत्येकाला काहीतरी देणारं होतं,कुणाचेही काहीही काढून घेणारं नसल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं.
काँग्रेसने 'फोडा आणि राज्य करा' हे सूत्र इंग्रजांपासून घेतलं आणि त्याचाच वापर त्यांनी यावेळी केला.मतदारसंघ पुनर्रचनेवर काँग्रेस आणि टीएमसी, डीएमके, समाजवादी पक्षाने सातत्याने अफवा पसरवल्या. या विधेयकाच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या संसदेतील प्रतिनिधित्वामध्ये समान वाढ होणार होती. परंतु, विरोधकांच्या विरोधामुळे हे होऊ शकलं नाही.
महिला आरक्षण विधेयक हे गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित होतं. या विधेयकाच्या माध्यमातून एकविसाव्या शतकातील महिलांना नवीन संधी मिळणार होत्या. तसेच त्यांच्या वाटेतील इतकी वर्षे असलेले अडथळेही दूर करणारे होते. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामुळे महिलांच्या वाट्याला येणाऱ्या मतदारसंघांमध्ये मोठी वाढ होणार होती. परंतु काँग्रेसला ते नको असल्याने त्याला विरोध केला. काँग्रेसनं इंग्रजांकडून घेतलेल्या तोडा फोडा आणि राज्य करा या सूत्राचा वापर यावेळी केल्याची टीकाही मोदींनी केली.
मोदी म्हणाले, आमच्याकडे हे विधेयक पास करण्यासाठी आज 60 टक्के बहुमत नव्हतं, पण देशातील कोट्यवधी महिलांची आम्हाला पाठिंबा आहे. महिलांच्या अधिकारांमध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणी आम्ही दूर करू असा आमचा विश्वास आहे. आम्ही फक्त त्या वेळेची वाट पाहत आहोत. काल आमच्याकडे संख्याबळ नाही म्हणजे आमचा पराभव झाला असं निश्चितच नाही. आमचा प्रयत्न कधीच थांबणार नसून भविष्यात ज्यावेळी आमच्याकडे अनेक संधी येतील,त्यावेळी आम्ही हा संकल्प नक्कीच पूर्ण करणार आहोत,असा शब्दही पंतप्रधान म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.