

Narendra Modi economic statement : इराण युध्दाच्या पार्श्वभूमीवर भारतासह जगभरातील अनेक देशांवर आर्थिक संकट घोंघावू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील दोन दिवस देशवासियांना त्याचे संकेत देताना बचतीचे आवाहन केले आहे. वर्षभर सोनं खरेदी करू नका, परदेशी प्रवास टाळा अशी आवाहने त्यांनी केले आहेत. त्याचे पडसादही उमटू लागले आहे. पण एवढ्यापुरतेच मर्यादीत राहणार नाहीत, तर त्याचा थेट परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन करताना देताना देशासमोरील अवाढव्य संकटाचे संकेत दिले आहेत. ते सातत्याने कोरोना काळाची आठवण करून देत आहेत. सहा वर्षांपूर्वी देशात कोरोनामुळे अनेक निर्बंध लादण्यात आले होते. आता पुन्हा तशीच एकजुट दाखविण्याचे आवाहन पंतप्रधान करत आहेत. कोरोना काळात केंद्रातील कर्मचाऱ्यांना १८ महिने महागाई भत्ता मिळाला नव्हता. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारेच निर्णय़ घेण्यात आले होते.
देशात सध्या आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा आहे. हा आयोग कधी लागू होणार, त्याचा कर्मचाऱ्यांना किती फायदा होणार, याची देशभर चर्चा सुरू असतानाच पंतप्रधान मोदींनी पुढील वर्षभरासाठी बचतीचे आवाहन करत सरकारी कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढविली आहे. पुढील काळात सरकारी खर्चावर मर्यादा आणल्या जाण्याची चिन्हे आहेत. असे झाल्यास आठव्या वेतन आयोगाचे काय होणार, याची चिंता कर्मचाऱ्यांना सतावू लागली आहे.
सरकारने कोरोना काळात महागाई भत्ता रोखला होता. त्यातही वाढही केली नव्हती. अद्याप आठव्या वेतन आयोगाचा अंतिम अहवाल आलेला नाही. आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी होण्यास वर्षभराचा कालावधी आहे. पण सध्याची स्थिती पाहता भविष्यात आर्थिक बोजा कमी करण्यासाठी आयोगाच्या शिफारशींमध्ये कपात केली जाण्याची भीती कर्मचाऱ्यांना आहे.
असे झाल्यास त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या वेतनासह इतर भत्त्यांवर होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अपेक्षित असलेल्या लाभ मिळणार नाही. या शक्यता असल्या तरी इराण युध्दातून लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास सरकार भविष्यात काही कठोर निर्णय घेऊ शकते, हे निश्चित.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.