

Prajwal Revanna mobile phone found in jail : लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी खासदार प्रज्वल रेवण्णाच्या बॅरकमधून मोबाईल फोन, चार्जर, पॉकेट नोटबुक आणि पेनड्राइव्ह जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या पेनड्राइव्हमध्ये ७० हून अधिक अश्लील व्हिडिओ आढळले असल्याची माहिती आहे. या प्रकरणी रेवण्णा आणि प्रताप रॉय यांच्याविरोधात परप्पन अग्रहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
प्रज्वल रेवण्णा सध्या परप्पन अग्रहार केंद्रीय कारागृहात आहे. बंगळुरू शहराचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या आदेशानुसार सीसीबीचे पोलिस निरीक्षक एम. एल. सुब्रमण्य स्वामी यांच्या पथकाने ११ ऑगस्ट रोजी दुपारी २.०५ ते रात्री ९ वाजेपर्यंत कारागृहाच्या सुरक्षा विभाग क्रमांक एक ते तीनमध्ये झडती घेतली.
सुरक्षा विभाग क्रमांक तीनमधील पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक चारमध्ये झडती घेतली असता फिकट निळ्या रंगाचा मोबाईल, पांढरा चार्जर, निळ्या रंगाची पॉकेट नोटबुक आणि काळ्या रंगाचा पेनड्राइव्ह आढळला.
झडतीनंतर सेलमधील कैद्यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी प्रज्वल रेवण्णाने निळ्या रंगाची नोटबुक आपली असल्याचे सांगितले. तर विचाराधीन कैदी प्रताप रॉयने मोबाईल फोन, चार्जर आणि पेनड्राइव्ह आपले असल्याचे चौकशीदरम्यान मान्य केल्याची माहिती आहे. प्रताप रॉयने या मोबाईलचा वापर नातेवाईक आणि वकिलांशी फोनवर बोलण्यासाठी करत असल्याचे सांगितले. तर प्रज्वल रेवण्णानेही नातेवाईक आणि वकिलांशी संपर्क साधण्यासाठी वेळोवेळी प्रतापच्या मोबाईलचा वापर केल्याचे कबूल केले.
तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या पेनड्राइव्हमध्ये ७० हून अधिक अश्लील व्हिडिओ आढळले आहेत. प्रज्वल रेवण्णा आणि प्रताप रॉय यांनी हा पेनड्राइव्ह मोबाईल आणि कारागृहातील टीव्हीला जोडून चित्रपट पाहण्यासाठी वापरल्याचे चौकशीदरम्यान सांगितल्याची माहिती आहे.
याशिवाय, मोबाईलमधील ‘जिंग्रा’ नावाच्या गेमिंग अॅपमध्ये काही अश्लील व्हिडिओ डाउनलोड केलेले आढळल्याचा दावाही करण्यात आला आहे. सेलमधील पलंगाखाली वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आणि मॉडेलची अर्धनग्न छायाचित्रेही आढळल्याचे तपास यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.
प्रज्वल रेवण्णा हा लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अशा परिस्थितीत त्याच्यासारख्या कैद्याच्या हाय-सिक्युरिटी सेलमध्ये मोबाईल आणि इतर प्रतिबंधित साहित्य पोहोचल्याने कारागृह प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मोबाईल, चार्जर आणि पेनड्राइव्ह नेमके कारागृहात कसे आले, ते कुणी उपलब्ध करून दिले आणि त्याचा वापर किती काळापासून सुरू होता, याचा तपास आता केला जात आहे.
या घटनेनंतर कारागृह प्रशासनाने प्रज्वल रेवण्णाला हाय-सिक्युरिटी विभागातून सामान्य शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या बॅरकमध्ये हलवले आहे. या बॅरकमध्ये ६० वर्षांवरील सुमारे २० कैदी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.