नवी दिल्ली : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू होती. परंतु, आज त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावरच बॉम्ब टाकला आहे. यामुळे ते काँग्रेस आणि गांधी परिवारापासून दुरावल्याचे स्पष्ट झाले आहे. याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपविषयीही (BJP) भाष्य केले आहे.
प्रशांत किशोर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. त्यात ते म्हणत आहेत की, भाजप पुढेही देशातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहणार आहे. काँग्रेस आधी 40 वर्षे देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी होती. अशीच स्थिती भाजप जिंकली अथवा हरली तरी असेल. भाजप कुठेही जाणार नाही. देशात तुम्ही एकदा 30 टक्के मते मिळवल्यानंतर लवकर तुम्ही बाहेर फेकला जात नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संतापून जनता भाजपला सगळीकडून सत्तेतून फेकून देईल, या जाळ्यात तुम्ही अडकू नका.
भाजप हा पुढील अनेक दशके येथेच राहणार आहे. ते अनेक दशके लढा देत राहतील. राहुल गांधींची समस्या बहुदा हीच आहे. त्यांना असे वाटत आहे की देशातील जनताच आता भाजपला सत्तेतून फेकून देईल. परंतु, असे घडताना दिसत नाही. तुम्ही मोदींच्या ताकदीची दखल घेऊन तिचे परीक्षण करीत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांना शह देता येणार नाही, असे किशोर यांनी म्हटले आहे.
गांधी परिवारातील तिन्ही सदस्यांसोबत किशोर यांची जुलै महिन्यात बैठक झाली होती. आधीही अनेक वेळा अशा बैठका झाल्या होत्या. किशोर यांनी काँग्रेसमध्ये रणनीतीकार अशी भूमिका देण्यावर प्रस्ताव समोर आला होता. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करुन पक्षाचे अधिकृत रणनीतीकार म्हणून काम पाहतील, अशी शक्यता व्यक्त झाली होती. किशोर यांची गांधी परिवारासोबतची बैठक ही केवळ पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकांपुरती मर्यादित नव्हती. काँग्रेस पक्ष 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी करू लागला आहे. यात किशोर हे महत्वाची भूमिका बजावतील, असेही वाटत होते.
पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांत एप्रिल-मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत किशोर रणनीतीकार म्हणून लक्षवेधी कामगिरी केली होती. बंगालमध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींची सत्ता आणून भाजपला धूळ चारली होती. संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या आणि भाजपने अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत ममतांचा विजय झाला होता. किशोर यांनी तमिळनाडूत द्रमुकचे एम.के.स्टॅलिन यांच्या विजयात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
बंगाल आणि तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय रणनीतीकार म्हणून निवृत्त होण्याची घोषणा किशोर यांनी केली होती. परंतु, त्यांची आयपॅक ही सल्लागार कंपनी अनेक पक्षांचे काम करीत आहे. त्यावेळी ते म्हणाले होते की, मला आता हे काम करायचे नाही. मी खूप काम केले आहे. आता मी विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. पुढील आयुष्यात मी आता वेगळे काही तरी करेन. पुढे काय करायचे यावर मी विचार करतोय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.