
Winter Session News : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी शुक्रवारी लोकसभेत फुल फॉर्ममध्ये दिसल्या. प्रियांका यांनी लोकसभेत पहिले भाषण केले आणि त्यांनी संविधानापासून अदानीपर्यंतच्या सर्वच मुद्द्यांवर सरकारवर जोरदार टीका केली. प्रियांका गांधी यांनी सत्ताधाऱ्यांनाही विचारले की, तुम्ही भूतकाळात किती दिवस जगणार, ही सर्व जबाबदारी नेहरूंची आहे का, तुम्ही नेहमी जुन्याच गोष्टी बोलता, तुमच्याबद्दल कधी बोलणार? असा सवाल करीत सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यांनी पहिल्यांदाच लोकसभेत भाषण केले. वायनाडच्या खासदाराने संविधान, शेतकरी, महागाई आणि अदानीचा मुद्दा देखील उपस्थित केला. (Priyanka Gandhi News)
लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवून काँग्रेसच्या (Congress) नेत्या प्रियंका गांधी पहिल्यांदाच खासदार म्हणून संसदेत पोहचल्या आहेत. त्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच प्रियंका गांधी यांनी लोकसभेत भाषण केले. भाषणाच्या सुरूवातीलाच प्रियंका गांधी (Priyanaka Gandhi) यांनी 13 डिसेंबर रोजी दहशतवादी हल्ल्यावेळी संसदेच्या सुरक्षा करत असताना शहीद झालेल्या सुरक्षा कर्मचार्यांना श्रध्दांजली अर्पण केली.
प्रियांका गांधी यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान लोकसभेत मार्गदर्शन केले. भाजप नेते राजनाथ सिंह यांच्या भाषणानंतर त्यांनी संसदेत पहिले भाषण केले, तेव्हा त्यांनी जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या सरकारांचा बचाव केला. याशिवाय आजी इंदिरा गांधी यांच्या वतीने आणीबाणी लादण्याची चूकही त्यांनी मान्य केली. आणीबाणीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, 'येथे आपण 1975 बद्दल बोलत आहोत. मी म्हणते तर मग आपण पण थोडसे शिका ना, तुम्ही फक्त बॅलेट पेपरवर निवडणुका का घेत नाही? त्यामुळे दुधाचे दुध आणि पाण्याचे पाणी होईल, असे स्पष्ट केले.
प्रियांका गांधी संविधानाबाबत बोलताना म्हणाल्या, भारतीय राज्यघटना ही 'आरएसएस'चे संविधान नाही. आपली राज्यघटना केवळ कागदपत्र नाही. न्याय आणि आशेची ज्योत आहे. या संविधानाने प्रत्येक नागरिकाला सरकार बनवण्याचा किंवा पाडण्याचा अधिकार दिला आहे. आपली राज्यघटना न्यायाची हमी देते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तर संविधान बदलण्याचे काम सुरू झाले असते
प्रियांका गांधी म्हणाल्या की, “आपले संविधान एक सुरक्षा कवच आहे जे देशातील लोकांना सुरक्षित ठेवते. वाईट गोष्ट ही आहे की सत्ता पक्षातील सहकारी जे मोठमोठ्या गोष्टी करतात त्यांनी गेल्या 10 वर्षात हे सुरक्षा कवच तोडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे. संविधानात सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाचे वचन आहे. हे वचन एक सुरक्षा कवच आहे. लॅटरल एंट्री आणि खासगीकरणाच्या माध्यमातून हे सरकार आरक्षण कमकुवत करण्याचे काम करत आहे. जर लोकसभा निवडणुकीत हा निकाल आला नसता तर यांनी संविधान बदलण्याचे काम देखील सुरू केले असते.
नेहरूंची देशासाठीची भूमिका नाकारता येणार नाही, असेही प्रियंका गांधी म्हणाल्या. नेहरूंनी देशात अनेक सार्वजनिक उपक्रमांची स्थापना केली. त्यामुळे नेहरूंना कधीही विसरता येणार नाही. संपूर्ण जबाबदारी नेहरूंची आहे का? ते नेहमी जुन्या गोष्टींबद्दल बोलत असतात, तुमच्याबद्दल कधी बोलणार ? आजबद्दल बोला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रियांका गांधी यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य केले आणि म्हणाल्या, उद्योगपतींसाठीही शेतीविषयक कायदे केले जात आहेत. या देशातील शेतकरी वायनाडपासून ललितपूरपर्यंत रडत आहेत. जेव्हा आपत्ती येते तेव्हा आराम मिळत नाही. आज या देशातील शेतकऱ्यांचा देवावर विश्वास आहे. जे काही कायदे बनवले आहेत ते बड्या उद्योगपतींसाठी बनवले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना प्रियांका गांधी म्हणाल्या, आजचे राजे वेश बदलतात, पण जनतेत जाण्याची हिंमत त्यांच्यात नाही. त्यासोबतच टीका ऐकण्याची ताकद त्यांच्यात नाही. आज देशात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे, मात्र भीती पसरवणारे स्वत: भीतीच्या सावटात जगत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
उन्नाव बलात्कार पीडितेच्या वेदना सभागृहासमोर मांडल्या
संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात खासदार प्रियंका गांधी यांनी उन्नाव बलात्कार पीडितेच्या वेदना सभागृहासमोर मांडल्या. याबरोबरच संविधानाने महिलांना लढण्याची शक्ती दिल्याचेदेखील त्या म्हणाल्या. प्रियांका गांधी म्हणाल्या की, “मी उन्नाव येथे बलात्कार पीडितेच्या घरी गेले होते. तिची जाळून हत्या करण्यात आली होती. ती कदाचित २०-२१ वर्षांची असेल. आपल्या सगळ्यांना मुले आहेत. आपण विचार करू शकतो की आपल्या मुलीवर वारंवार बलात्कार झाला आणि जेव्हा ती आपली लढाई लढण्यासाठी गेली तेव्हा तिला जाळून ठार करण्यात आले, तर आपल्याला काय सहन करावे लागत असेल.”
पंतप्रधान मोदींवर केली टीका
प्रियांका गांधी यांनी आपल्या संसदेतील पहिल्याच भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली, त्या म्हणाल्या की, पंतप्रधान येथे सभागृहात संविधानाचे पुस्तक डोक्याला लावतात. पण संभल, हाथरस मणिपूर येथे न्यायाची मागणी केली जाते तेव्हा त्यांच्या कपाळावर रेषदेखील दिसत नाही. कदाचित त्यांना समजलेले नाही की भारताचे संविधान संघाचे विधान नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.