नवी दिल्ली : पंजाबसह (Punjab) इतर चार राज्यांमध्ये काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाला आहे. पंजाबमधील सत्ता गेल्याने पक्षातील अंतर्गत वाद पेटला आहे. रविवारी दिल्लीत झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीतही याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. त्यावरून माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल जाखड (Sunil Jakhar) यांनी माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) आणि खासदार अंबिका सोनी (Ambika Soni) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
जाखड यांनी काही बातम्यांचे फोटो ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली. या बातमीमध्ये चन्नी यांना काँग्रेसची संपत्ती असल्याचे म्हटले आहे. यावरून जाखड यांनी म्हटलं आहे की, संपत्ती, तुम्ही गंमत करत आहात का? देवाचे आभार, चन्नी यांना त्या पंजाबी महिलेने (अंबिका सोनी) काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या (CWC) बैठकीत राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केलं नाही. त्यांनी पहिल्यांदा चन्नी यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी प्रस्तावित केलं होतं. चन्नी त्यांच्यासाठी संपत्ती असून शकतात, पण पक्षासाठी ओझं आहेत. काँग्रेस हायकमांड नव्हे तर त्यांच्या लालचीपणामुळे स्वत: चन्नी आणि पक्षाचं नुकसान केलं.
आपल्या ट्विटबाबत माध्यमांशी बोलताना जाखड म्हणाले, कुणावरही आरोप करणे हा माझा हेतू नाही. पण काल CWC मध्ये हायकमांडची ज्यापध्दतीने दिशाभूल करण्यात आली, त्यामुळे निराश झालो आहे. मागील 30 वर्षांपासून राज्यसभेत खासदार असलेल्यांनी सीएम पदासाठी चन्नी यांचं नाव सुचवलं होतं. पंजाबमधील लोकांना बदल हवा होता. पण ज्यांना पुढं करण्यात आलं ते त्यांच्याच हाताने अडकले. आजारापेक्षा उपचार भयानक होते, अशी टीका जाखड यांनी केली. पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासू नेता हवा होता. आता पुढील पाच वर्ष पक्ष आणि पंजाबसाठी आव्हानात्मक असतील, असंही जाखड म्हणाले.
अमरिंदरसिंग यांच्याबाबतीत चूक केली
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत अमरिंदरसिंग यांना जास्तवेळ दिला, याची कबुली अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिली. त्यांच्याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. पण त्यानंतरही त्यांना न हटवता संधी दिली. त्यानंतर त्यांना बदलण्यात विलंब केला. याची जबाबदारी घेत असल्याचे सांगत सोनिया यांनी चूक मान्य केली. सुमारे चार तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकी अध्यक्षपदासह पंजाबमधील पराभवावर मंथन करण्यात आलं.
सिध्दू व कुटुंबावर फोडलं खापर
या बैठकीत पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू (Navjot Singh Sidhu) यांच्यावर पराभवाचं खापर फोडण्यात आलं. तसेच मुख्यमंत्री बदलण्यात आलेला विलंब त्यास कारणीभूत असल्याचं मत अनेक नेत्यांनी मांडलं. तसेच सिध्दूंवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिध्दू यांची पत्नी व मुलीवरही अजय माकन यांनी ठपका ठेवला. चन्नी यांना पक्षाने मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सिध्दू यांच्या पत्नीने केलेली वक्तव्य पक्षविरोधी होती. गरीब मुख्यमंत्री या पक्षाच्या घोषणेविरोधातच त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या मुलीने केलेल्या अशाच वक्तव्यामुळेही पक्षाला मोठा फटका बसल्याचा दावा माकन यांनी आपल्या अहवालात केला. हा अहवाल त्यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत सादर केला आहे. त्यामुळे सिध्दूंवर कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असं सुत्रांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.