

Congress News : उत्तर भारतात लागोपाठ पराभव पत्करावे लागल्यानंतर काँग्रेसने दक्षिण भारतात लक्ष केंद्रीत केले आहे. इथे नवीन, आक्रमक आणि 'मास लीडर' घडवण्यावर भर दिला आहे. आधी तेलंगणा, मग आंध्रप्रदेश, तामिळनाडू, मग केरळ आणि आता कर्नाटकमध्ये काँग्रेसने धाडसी निर्णय घेतले आहेत. या निर्णयांसाठी राहुल गांधी यांनी प्रसंगी वरिष्ठ नेत्यांच्या मताच्या विरोधात जाऊन निर्णय घेतले आहेत. आता हेच निर्णय भाजपच्या 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेला रोखण्यासाठी काँग्रेसची 'मजबूत' तटबंदी ठरू शकतात अशी चर्चा आहे.
१. कर्नाटक : 'ट्रबलशूटर' डी. के. शिवकुमार यांचा उदय
सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकमध्ये डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होत आहेत. त्यामुळे काँग्रेस इथल्या राजकारणाचा एक मोठा अध्याय बदलला आहे. डी. के. शिवकुमार हे तळागाळातील कार्यकर्त्यांशी जोडलेले आणि प्रचंड आर्थिक व संघटनात्मक ताकद असलेले नेते आहेत. सिद्धरामय्यांचे राजकारण हे मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक मतपेढीवर आधारित होते, तर शिवकुमार यांच्या येण्याने वोक्कलिगा समुदाय आणि तरुण वर्ग काँग्रेसकडे अधिक आक्रमकपणे आकर्षित होईल. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदामुळे काँग्रेस हायकमंडला दक्षिणेतून मिळणारा पाठिंबा आणि रसद आणखी मजबूत होईल, असा अंदाज आहे.
२. तामिळनाडू: 'द्रमुक'ला सोडचिठ्ठी आणि 'विजय' यांच्याशी नवी युती
काँग्रेसने तामिळनाडूत आपली जुनी आणि विश्वासू मित्रपार्टी 'द्रमुक'ची साथ सोडून सुपरस्टार विजय यांच्या 'तमिझगा वेत्री कळघम' सरकारला पाठिंबा देणे, हा या दशकातील सर्वात मोठा राजकीय जुगार आहे. द्रमुकसोबत काँग्रेस नेहमीच 'ज्युनिअर पार्टनर' राहिली आहे.
मात्र, विजय यांच्यासारख्या तरुण आणि प्रचंड लोकप्रिय नेत्याला पाठिंबा देऊन काँग्रेसने तब्बल 60 वर्षांनंतर तामिळनाडूच्या सत्तेत एन्ट्री घेतली आहे. काँग्रेस पक्ष प्रादेशिक पातळीवर 'जुन्या चेहऱ्यांपेक्षा' विजय यांच्यासारख्या नव्या, ग्लॅमरस आणि तरुणांमध्ये क्रेझ असलेल्या नेत्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा विस्तार करत आहे, हे यावरून स्पष्ट होते.
३. केरळ (व्ही. डी. सतीशन):
केरळ विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून व्ही. डी. सतीशन (वय ६० च्या आसपास) यांनी डाव्या आघाडीच्या सरकारला नाकीनऊ आणले आहेत. ते अत्यंत सुशिक्षित, अभ्यासू आणि तरुण वर्गात लोकप्रिय चेहरा आहेत. के.सी. वेणुगोपाल, रमेश चेन्नीथाला यांच्यासारख्या नेत्यांना मागे ठेवून सतीशन यांना मुख्यमंत्री बनवले हा काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय मानला जातो.
४. तेलंगणा (अनुमुला रेवंथ रेड्डी) :
वयाच्या पन्नाशीत असलेले रेवंथ रेड्डी हे त्यांच्या आक्रमक राजकारणासाठी ओळखले जातात. त्यांनी केसीआर यांच्या 'बीआरएस' आणि भाजप या बलाढ्य पक्षांला धूळ चारत तेलंगणात काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून दिली. काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री बनवले आहे.
५. आंध्रप्रदेश (वाय. एस. शर्मिला) :
काँग्रेसच्या फळीला उद्ध्वस्त करत जगनमोहन रेड्डी यांच्या 'वायएसआर काँग्रेस'ने आंध्रप्रदेश ताब्यात घेतले. आता आंध्रप्रदेश काँग्रेसमध्ये चैतन्य आणण्यासाठी राहुल गांधींनी वाय. एस. शर्मिला या जनगमोहन रेड्डी यांच्या बहिणीकडेच कमान दिली. शर्मिला थेट जनतेत जाऊन आपल्या भावाविरुद्ध लढा देत आहेत, ज्यामुळे तिथे काँग्रेस पुन्हा चर्चेत आली आहे.
काँग्रेससाठी दक्षिण भारताचे राजकीय आणि रणनीतिक महत्त्व
सत्तेचा मुख्य स्त्रोत : सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेससाठी दक्षिण भारत 'संजीवनी' ठरला आहे. उत्तर भारतात भाजपचे वर्चस्व असताना, दक्षिण भारतानेच काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणात जिवंत ठेवले आहे. कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ या 2 आर्थिकदृष्ट्या समृद्ध राज्यांची सत्ता काँग्रेसच्या हातात आहे. तर तामिळनाडूमध्ये काँग्रेस सत्तेत आहे.
आर्थिक रसद :
बंगळुरू (कर्नाटक) आणि हैदराबाद (तेलंगणा) ही देशातील सर्वात मोठी आयटी आणि आर्थिक केंद्रे आहेत. या राज्यांमध्ये सत्ता असल्यामुळे काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या अफाट आर्थिक ताकदीशी मुकाबला करण्यासाठी आर्थिक बळ मिळते.
लोकसभा जागांचे गणित :
दक्षिण भारतातील ५ राज्यांमध्ये (तसेच पुद्दुचेरी आणि लक्षद्वीप) मिळून लोकसभेच्या १३१ जागा आहेत. राष्ट्रीय राजकारणात भाजपला बहुमतापासून रोखण्यासाठी काँग्रेसला या १३१ जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकणे अनिवार्य आहे.
'इंडिया' आघाडीचा गड :
तामिळनाडूतील स्टॅलिन आणि केरळमधील डावे पक्ष हे भाजपविरोधी शक्ती म्हणून काम करत आहेत. जरी राज्याच्या सत्तेत हे पक्ष एकमेकांविरोधात लढत असले तरी देशाच्या राजकारणासाठी काँग्रेसचे महत्त्वाचे मित्रपक्ष आहेत. त्यामुळे दक्षिण भारत हा भाजपविरोधी विचारसरणीचा मुख्य बालेकिल्ला बनला आहे.
काँग्रेस आता 'बॅकसीट'वरून 'फ्रंटसीट'वर!
यावरून आपल्या एक लक्षात येते ते म्हणजे, काँग्रेस आता केवळ प्रादेशिक पक्षांच्या भरवशावर न राहता, स्वतःहून किंवा नव्या मित्रांच्या मदतीने आक्रमक निर्णय घेत आहे. कर्नाटकात शिवकुमार आणि तामिळनाडूत विजय यांच्या पाठीशी उभे राहून काँग्रेसने दक्षिण भारतात 'तरुण, आक्रमक आणि थेट निर्णय घेणारे राजकारण' सुरू केले आहे.
पक्षाने आता दिल्लीतील वातानुकूलित कार्यालयात बसून राजकारण करणाऱ्या जुन्या नेत्यांना बाजूला सारून, जमिनीवर लढणाऱ्या प्रादेशिक नेत्यांना मोकळीक दिली आहे. रेवंथ रेड्डी, डी. के. शिवकुमार, व्ही. डी. सतिशन आणि वाय. एस. शर्मिला हे सर्व नेते स्वतःच्या बळावर गर्दी खेचणारे आणि थेट भाजप किंवा प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना त्यांच्याच भाषेत चोख उत्तर देणारे आहेत.
उत्तर भारतात 'नवे नेतृत्व' तयार करण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसने दक्षिण भारतात मात्र हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. भविष्यात काँग्रेसचा राष्ट्रीय स्तरावरील पुनरुत्थान हा याच दक्षिण घाटातील नव्या चेहऱ्यांच्या कामगिरीवर अवलंबून असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.