

Priyanka gandhi reply parliament : लोकसभेत मंगळवारी अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात आणण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. या चर्चेदरम्यान संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यादरम्यान त्यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे नाव घेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची खिल्ली उडविली. रिजिजू यांच्या कृतीला प्रियांका यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले.
लोकसभेत राहुल गांधी यांना बोलू दिले जात नाही, अध्यक्षांकडून सत्ताधारी सदस्यांना झुकते माप दिले जाते आदी आरोप करत विरोधकांनी बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. त्यावर काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरूवात केली. त्यानंतर किरेन रिजिजू यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत या प्रस्तावाला जोरदार विरोध केला.
रिजिजू यांनी यापूर्वीच्या अविश्वास प्रस्तावांवर भाष्य करत तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणाचा संदर्भ दिला. बिर्ला यांच्याकडून सर्वपक्षीय सदस्यांना समान वागणूक दिली जात असल्याचे ते म्हणाले. याउलट राहुल गांधी यांच्याकडूनच नियमांचे पालन केले जात नसल्याचा आरोप केला.
राहुल गांधी यांच्या वागणुकीवरही त्यांनी बोट ठेवले. २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकसभेत मारलेली मिठी, त्यानंतर सहकारी खासदाराला मारलेला डोळा, या मुद्द्यांची आठवण करून देत रिजिजू यांनी असा विरोधी पक्षनेता पहिल्यांदाच पाहिल्याचे सांगत खिल्ली उडविली. यावेळी त्यांनी प्रियांका गांधी विरोधी पक्षनेत्या असत्या तर कदाचित चांगली कामगिरी केली असती, असा टोलीही लगावला.
सभागृहात असलेल्या प्रियांका गांधी रिजिजू यांचे भाषण ऐकताना हसत होत्या. त्यावरूनही रिजिजू यांनी फिरकी घेतली. त्यांचे भाषण थांबल्यानंतर मात्र प्रियांका यांनी जोरदार पलटवार केला. ज्या नेहरूंवर ते टीका करतात आज त्यांचेच कौतुक करत आहे. इतरवेळी त्यांचा सतत अपमान करतात. म्हणून मी त्यांच्यावर (सत्ताधारी) हसत आहे.
विरोधी पक्षनेते जे बोलतात, ते त्यांना (सत्ताधारी) सहन होत नाही. देशातच एकच व्यक्ती आहे, जो १२ वर्षांपासून यांच्यासमोर झुकलेला नाही. ते विरोधी पक्षनेते राहुल गांधी आहेत. या सभागृहात उभे राहुल कुणालाही न घाबरता ते बोलतात. मात्र, त्यांना सत्य पचवता येत नाही, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.
सभागृहातून बाहेर आल्यानंतर प्रियांका यांनी बंधू राहुल यांचे कौतुक केले. माझे बंधू नेहमीच सत्य बोलतात. मोदी सरकारसमोर ते झुकत नाहीत. भाजपने त्यांना रोखण्यासाठी कोटयवधी रुपये खर्च केले. सोशल मीडियाक मोहिम चालविली. पण सत्य सर्वांसमोर आहे. राहुल गांधी सत्य बोलण्यापासून मागे हटत नाहीत, हे लोक पाहत आहेत. त्यामुळेच सत्तेत बसलेल्या लोकांना त्यांची भीती वाटते, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.