

Congress news : नवी दिल्लीतील एआय समिटमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अर्धनग्न आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संताप व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे इंडिया आघाडीतील काही नेत्यांसह काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. प्रामुख्याने काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर भाजपने जोरदार हल्ला चढविला होता. त्यातच काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने थेट इंडिया आघाडीच्या नेतृत्व बदलावर भाष्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
इंडिया आघाडीचे नेतृत्व सध्या काँग्रेस करत असली तरी आघाडीचा नेता म्हणून कुणाच्याही नावावर एकमत नाही. काँग्रेसकडून मात्र राहुल यांचेच नाव सातत्याने पुढे रेटले जात आहे. आज आघाडीतील घटकपक्षाचे नेते व जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले.
इंडिया आघाडीत नेतृत्व बदलाबाबत सध्या कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले. उत्तर काश्मीरमधील गुलमर्ग येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. भाजपशी लढण्यात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही, असे म्हणत आपण राहुल गांधी यांच्या पाठीशी असल्याचे उमर अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी द्रमुकचे प्रमुख आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन हे ‘इंडिया’ आघाडीचे संयोजक होण्यासाठी योग्य व्यक्ती असल्याचे मत व्यक्त केले होते. त्याबाबत विचारले असता अब्दुल्ला म्हणाले, की ते अय्यर यांचे वैयक्तिक मत आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही ज्यात नेतृत्व बदलावर चर्चा झाली आहे. निर्णय घ्यायचा असल्यास तो सर्व घटक पक्ष एकत्र बसून घेतील, असे त्यांनी सांगितले.
नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष अब्दुल्ला यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पाठिंबा दर्शविला. भाजपविरोधात लढताना राहुल गांधी यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही, असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेत्याचे काम म्हणजे सरकारला जाब विचारणे आणि सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीका करणे. राहुल गांधी हे काम प्रामाणिकपणे करत आहेत, असे त्यांनी नमूद केले. काँग्रेस काही निवडणुकांत यशस्वी होत नाही, हे खरे असले तरी ‘इंडिया’ आघाडीचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे भाजपला विरोध करणे आणि केंद्र सरकारला जबाबदार धरणे, असेही अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले. नेतृत्वाचा प्रश्न आघाडीच्या अंतर्गत चर्चेनंतरच ठरेल, असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.