

Rahul Gandhi: भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि इतर दोन आयुक्तांच्या भेटीसाठी निघालेला राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी आकाशवाणी भवन इथंच रोखून धरलं होतं. त्यामुळं गेल्या ८ तासांपासून इथं ठिय्या आंदोलन करणाऱ्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह इतर खासदारांना पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलं. ही संपूर्ण कारवाई सुरु असताना आकाशवाणी भवन इथं प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. मोठ्या प्रमाणावर इथं पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी SIR बाबत एकतर्फी निर्णय घेतले आणि त्यामुळं त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये गडबडी झाल्याचा आरोप काँग्रेसह इंडिया आघाडीनं केला आहे. त्यामुळं त्यांच्या राजीनाम्यासाठी इंडिया आघाडीनं सातत्यानं मागणी केली आहे. त्याचाच भाग म्हणून आज थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडीच्यावतीनं मोर्चा काढण्यात आला होता. पण दिल्ली पोलिसांनी तो मध्येच आकाशवाणी भवन इथं अडवला त्यानंतर राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी ठिय्या आंदोलन केलं. गेल्या आठ तासांहून अधिक काळापासून हे सर्वजण आकाशवाणी भवन परिसरातच ठिय्या मांडून होते.
दरम्यान, लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस खासदार प्रियांका गांधी, इम्रान प्रतापगडी, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, के. सी. वेणुगोपाल, टीएमसीचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यासह इतर अनेक इंडिया आघाडीतील खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. यांच्यासह जवळपास ३०० विरोधी खासदार या ठिकाणी आंदोलन करत होते. या सर्वांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
दिवसभर आकाशवाणी भवन परिसरात या आंदोलनामुळं मोठा गोंधळ सुरु असताना पोलिसांनी देखील या खासदारांना तिथून हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे आणि तो आमच्याकडून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, अशी भूमिका यावेळी राहुल गांधी यांनी मांडली. दिवसभर हाच गोंधळ सुरु असल्यानं अखेर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास दिल्ली पोलिसांनी या खासदारांना ताब्यात घेण्यासाठी तीन बस मागवल्या. त्यानंतर राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह सर्व खासदारांना या बसेसमध्ये भरुन जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. या ठिकाणी त्यांना काही काळ ताब्यात ठेवून त्यानंतर आवश्यक कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोडून देखील देण्यात येईल, असं सांगितलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.