

BJP Rajya Sabha candidate news : मध्य प्रदेशात राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यात भाजपची सत्ता असून तब्बल १६४ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे पुरी यांच्या विजयाची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही पुरी यांना बाय दिला आहे. पण एका शिक्षकाने मात्र निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत.
राज्यातील बैतूल येथील ५५ वर्षीय शिक्षक हरिपलाल बिहारे यांनी राज्यसभेची पोटनिवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ते १० प्रस्तावकांच्या सह्या मिळविण्यासाठी भोपाळमध्ये ठाण मांडून बसले आहेत. केवळ काँग्रेसच नाही तर भाजपच्या नेत्यांच्याही गाठीभेटी मिळविण्याच्या प्रयत्नात ते आहेत.
बिहारे यांनी अपक्ष निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. पुरी वगळता उमेदवारी अर्ज घेणारे ते एकमेव ठरले आहेत. असे असले तरी त्यांच्यासाठी पुढची वाट बिकट असणार आहे. प्रस्तावकांच्या सह्या असल्याशिवाय त्यांना निवडणूक लढता येणार नाही. त्यामुळे ते दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. एका सर्वसामान्य नागरिकाला ते पाठिंबा देतील, अशा विश्वास ते व्यक्त करत आहेत.
बिहारे यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा बोलून दाखविली आहे. त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, राजकीय पक्ष राज्यसभेसाठी राज्याबाहेरील लोकांना उमेदवारी देतात. त्यामुळे आपण नाराज आहोत. ज्या नागरिकाकडे कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही, पैसा नाही, तोही निवडणूक लढण्याचे आणि जिंकण्याचे स्वप्न पाहू शकतो, हे आपल्याला दाखवून द्यायचे आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांच्या राजीनाम्यामुळे मध्य प्रदेशात एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यांनी १३ ऑक्टोबरला राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागेचा कार्यकाळ एप्रिल २०३० पर्यंत असणार आहे. पोटनिवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत कोणीही उमेदवार असले तरी पुरी यांचा विजय निश्चित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.