

INDIA bloc candidate nomination : महाराष्ट्रासह देशातील दहा राज्यांतील ३७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ तीनच दिवस उरले आहे. काही उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून काही जागांसाठी अजूनही खलबते सुरू आहेत. या निवडणुकीत काही धक्कादायक निर्णय आणि निकालही लागण्याची शक्यता आहे.
बिहारमध्येही पाच जागांसाठी निवडणूक होणार असून चार जागांवर ‘एनडीए’चे उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. तर पाचव्या जागेसाठी इंडिया आघाडीकडून चाचपणी सुरू असून सर्वात मोठे नाव समोर आले आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय जनता दलाचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
बिहारमध्ये सत्ताधारी संयुक्त जनता दल व भाजपला थेट भिडणार एकमेव नेता म्हणून तेजस्वी यांच्याकडे पाहिले जाते. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षासह इंडिया आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर राज्यसभेच्या रुपाने पहिलीच निवडणूक होत आहे. मात्र, ही निवडणूकही आघाडीसाठी सत्वपरीक्षा ठरणार आहे. त्यासाठी यादव यांचे नाव पुढे केले जाण्याची शक्यता आहे.
तेजस्वी यादव हे बिहारमधून राज्यसभेत गेल्यास संसदेत सत्ताधाऱ्यांना थेट भिडणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ शकते. राज्यसभेतील विरोधकांचा आवाज अधिक बुलंद होऊ शकतो. मात्र, त्यांना निवडून जाणे तितकेसे सोपे नाही. विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला केवळ ३५ जागा मिळाल्या आहेत. राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी किमान ४१ आमदारांचा पाठिंबा हवा आहे.
निवडणुकीत पाचव्या जागेसाठी एमआयएम हा पक्ष किंगमेकर ठरणार आहे. खासदार असदुद्दीने ओवैसी यांच्या या पक्षाचे राज्यात पाच आमदार आहेत. एमआयएमप्रमाणेच आघाडीला मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाच्या एका आमदाराची गरज भासणार आहे. या सहा आमदारांनी आघाडीला पाठिंबा दिल्यासच त्यांचा उमेदवार राज्यसभेत जाऊ शकते.
सर्व ४१ आमदारांच्या मतांची खात्री पटल्यानंतरच तेजस्वी यादव राज्यसभा निवडणूक लढण्यासाठी होकार देतील, अशी दाट शक्यता आहे. अद्याप त्यावर विचारमंथन सुरू आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवनानंतर ते लगेच पुन्हा दुसऱ्या पराभवाचा सामना करू इच्छित नाही. ४१ मतांची गोळाबेरीज न झाल्यास ते उमेदवार नसतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता ओवैसी आणि मायावती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.