

Rajya Sabha seat contest : राज्यसभा निवडणुकीदरम्यान नव्या समीकरणांची नांदी होण्याचे संकेत मिळाले आहे. राजकारणातील काँग्रेसचा कट्टर शत्रू असलेल्या बिजू जनता दलाच्या खेळीने ओडिशातील राजकारणाला कलाटणी मिळण्याची चिन्हे आहेत. बीजेडीचे प्रमुख नवीन पटनायक यांचा हा राजकीय डाव सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढविणारा ठरणार आहे.
काँग्रेसने राजकीय शत्रूत्व दूर सारत राज्यसभा निवडणुकीत थेट बीजेडीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ओडिशामध्ये पहिल्यांदाच असे चित्र पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे. या राजकीय डावपेचामुळे भाजपची अडचण झाली आहे. केवळ एका जागेसाठी वर्चस्वाची लढाई शिगेला पोहोचल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
ओडिशातील राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. विधानसभेच्या १४७ सदस्यांपैकी एकट्या भाजपचे ७९ आमदार असून तीन अपक्षांचाही पाठिंबा आहे. तर बीजेडीकडे ४८, काँग्रेस १४ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक आमदार आहे. राज्यसभेचा उमेदवार निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या किमान ३० मतांची गरज आहे.
सध्याचे संख्याबळ पाहता भाजपचे दोन उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. त्यानंतर त्यांच्याकडे २३ मते शिल्लक राहतात. आणखी एक उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला केवळ सात मतांची गरज आहे. तर बीजेडीचा केवळ एकच उमेदवार सहजपणे निवडून येईल, एवढेच संख्याबळ आहे. त्यानंतर पटनायक यांनी मोठी रिस्क घेत दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा करत थेट भाजपला आव्हान दिले आहे.
पटनायक यांनी आपले राजकीय सचिव संत्रिप्त मिश्रा आणि दुसऱ्या जागेसाठी प्रसिध्द यूरोलॉजिस्ट डॉ. दत्तेश्वर होता यांना ‘कॉमन’ उमेदवार म्हणून घोषित केले आहे. होता यांच्या नावाची घोषणा करताना पटनायक यांनी सर्वच राजकीय पक्षांना त्यांना राज्यहितासाठी निवडून देण्याचे भावनिक आवाहन केले आहे. पटनायक यांच्या या खेळी भाजपचे मनसुबे उधळले गेले आहेत.
काँग्रेसने होता यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केल्याने बीजेडीचे दोन्ही उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. आता भाजप तिसरा उमेदवार देऊन राजकीय आव्हान देणार की कॉमन उमेदवार म्हणून राज्यहितासाठी होता यांचा मार्ग मोकळा करणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे. भाजपने उमेदवार दिल्यास बीजेडी आणि काँग्रेसमधील जवळीक आणखी वाढण्याची भीतीही भाजपला आहे. असे झाल्यास राज्याच्या राजकीय पटलावर नव्या समीकरणांचा उदय होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.