
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविषयी सर्वात मोठी बातमी आहे. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी राहुल यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करत असल्याचे जाहीर केले आहे. राहुल यांनी संसदेत मनुस्मृतीविषयी केलेल्या विधानामुळे शंकराचार्य भडकले आहेत. राहुल गांधी हे मनुस्मृतीला आपला ग्रंथ मानत नसल्याने ते हिंदू नाही, असेही शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी म्हटले आहे.
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी रविवारी मीडियाशी बोलताना ही घोषणा केली. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी संसदेत मनुस्मृतीविषयी एक विधान केले होते. एका बलात्काराच्या घटनेवरून ते संसदेत बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, बलात्कारी लोकांना संविधानात संरक्षण दिले जात नाही, ते मनुस्मृतीमध्ये दिले जाते.
राहुल यांच्या विधानावर शंकराचार्य संतापले आहेत. त्यांनी या विधानाची गांभीर्याने दखल घेतली असून राहुल यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ते म्हणाले, राहुल गांधी हे मनुस्मृतीच्या पुस्तकाला मानत नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. जे मनुस्मृतीला आपले पुस्तक मानत नाहीत, ते हिंदू असू शकत नाहीत. मनुस्मृती हा हिंदूंचा धर्मग्रंथ आहे. मनुस्मृती हे सर्वात पहिले संविधान आहे.
राहुल गांधी यांच्याकडून त्यांच्याबाबत खुलासाही मागण्यात आला होता, अशी माहिती शंकराचार्यांनी दिली. राहुल यांनी तीन महिन्यांनंतरही खुलासा केला नाही. त्यांचे कोणतेही उत्तर आले नाही किंवा त्यांनी माफीही मागितली नाही. जेव्हा एखादी व्यक्ती सातत्याने हिंदू धर्मग्रंथांचा अपमान करते आणि स्पष्टीकरणही देत नाही, तेव्हा अशा व्यक्तीला हिंदू धर्मात स्थान दिले जाऊ शकत नाही, असे शंकराचार्य म्हणाले.
आता राहुल गांधींचा मंदिरांमध्ये विरोध व्हायला हवा. ते स्वत:ला हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. पुजाऱ्यांनीही ते मंदिरात आल्यास पूजा करू नये, असे आवाहन शंकराचार्यांनी केले आहे. शंकराचार्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राहुल यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधाने केली आहेत. पण पहिल्यांदाच शंकराचार्यांनी त्यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.