Nupur Sharma: प्रेषित महंमद पैगंबरांबद्दल अनुद्गार काढणाऱ्या निलंबित भाजप (BJP) प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) चांगलेच फटकारले आहे. "शर्मा यांच्या बेजबाबदार विधानांमुळे देशात आज अशांती पसरली असून त्यांनी टीव्हीवर जाऊन संपूर्ण देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे," अशी कडक टिप्पणी न्यायालयाने केली.
उदयपूर येथील तरूणाच्या हत्या प्रकरणाचा उल्लेख करताना न्यायालयाने, देशात शर्मा यांच्या विधानांमुळेच ही अशांती पसरल्याचे स्पष्टपणे सांगितले. यानंतर शर्मा यांनी आपला अर्ज मागे घेतला असून त्या दिल्ली उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतील अशी चिन्हे आहेत.
एका खासगी वाहिनीवरील कार्यक्रमात शर्मा यांनी प्रेषित पैगंबरांबाबत पवित्र हदीसमधील संदर्भांचा चुकीचा अर्थ काढून अत्यंत आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप आहे. शर्मा यांनी जीभ सैल सोडल्यावर जगभरातील मुस्लिम समाजात प्रचंड रोष निर्माण झाला होता. जागतिक इस्लामी संघटनेसह कतार व ओमानसह १७ ते १८ मुस्लिम देशांनी कडक निषेध नोंदवला होता. कतारने तर उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या सन्मानार्थ आयोजित मेजवानीही रद्द केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार नायडू यांनी परिस्तितीचे गांभीर्य ओळखून त्वरित दिल्लीशी संपर्क साधला व तातडीने हालचाली करण्याची सूचना केली. त्यानंतर सत्तारूढ भाजप नेतृत्वाला जाग आली व तब्बल १० दिवसांनी नुपूर शर्मा यांना निलंबित करण्यात आले.
शर्मा विरूध्द महाराष्ट्रासह देशात अनेक राज्यांतही गुन्हे दाखल झाले. या सर्वांची एकत्रित सुनावणी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका शर्मा यांनी न्यायालयात सादर केली होती. न्या. सूर्यकांत व न्या. जे बी पारडीवाला यांच्या पीठासमोर आज त्याची सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने शर्मा यची अतिशय कडक शब्दांत कानउघाडणी केली. शर्मा या एका राजकीय पक्षाच्या प्रवक्त्या आहोत व त्यांच्यामागे ‘सत्तेचा बॅकअप'ही आहे म्हणून काय झाले? त्या कायद्याचा सन्मान न करता कोणतेही विधान बेधडक करू शकतो असे त्यांना कसे वाटले? अशा फैरी न्यायालयाने झाडल्या.
शर्मा यांनी आधी माफी मागण्यास उशीर केला व जनतेतील संताप व रोष प्रकट झाल्यावर त्यांनी माफी मागितली हे न्यायालयाने लक्षात आणून दिले. आपण काय बोलतो त्याच्या परिणामांची पर्वा केल्याविनाच शर्मा यांनी बेजबाबदार विधाने केली. देशातील हिंसक घटनांना शर्मा याच जबाबदार असल्याचे न्यायालयाने सांगितले. शर्मा यांचे वकील मनिंदरसिंग यांनाही न्यायालयाने फटकारले.
"आम्ही संबंधित वाहिनीवरील संपूर्ण चर्चा पाहिली," असे सांगून न्या. सूर्यकांत म्हणाले की, त्यात कशी चिथावणी दिली गेली हेही आम्ही पाहिले. ज्या पध्दतीने शर्मा हे सारे बोलल्या व वरून त्यांनी 'आपण वकील आहोत' असे सांगितले हे सारेच लाजिरवाणे आहे. त्यांनी त्याच वेळी टीव्हीवर जाऊन माफी मागायला हवी होती. त्यालाही त्यांनी उशीर केला.
न्यायालयाने दिल्ली पोलिस व टीव्ही वाहिनीबद्दलही नाराजी व्यक्त केली. एखाद्या अजेंड्याचा प्रचार करण्यासाठी या वाहिनीने या मुद्यावर अशा पध्दतीने चर्चा करायचे काय कारण होते? शर्मा यांना ही चर्चा विपर्यस्त पध्दतीने दाखविली गेली, असे वाटत असेल तर त्यांनी संबंधित ॲकरवर एफआयआर का दाखल केली नाही?,असा सवालही न्यायालयाने केला. एखाद्यावर साधा एफआयआर दाखल झाला तर त्याला तुम्ही (पोलिस) त्वरित अटक करता. पण जेव्हा हे तुमच्या विरूध्द होते तेव्हा तुम्हाला हात लावायची हिंमतही कोणी केली नाही, असे न्यायालयाने पोलिसांनाही फटकारले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.