
Mumbai News : महायुती सरकारकडून महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी मराठीच्या मुद्द्यावर मोर्चाची हाक देत एल्गार पुकारला होता. सरकारनं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही जीआर रद्द केले. त्यानंतर शनिवारी (ता.5 जुलै) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्यावरुन आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं असतानाच दुसरीकडे आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी ट्विट करत ठाकरे बंधूंच्या मेळाव्याबाबत मोठं विधान केलं आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन (M K Staline) यांनी ठाकरे बंधूंच्या मराठीच्या मुद्द्यावरुन झालेल्या विजयी मेळाव्यावर ट्विटद्वारे भाष्य केलं आहे. यात त्यांनी राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंचं कौतुक करतानाच केंद्र आणि महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
CM स्टॅलिन ट्विटमध्ये म्हणतात,हिंदी लादण्याचा विरोध करण्यासाठी द्रविड मुन्नेत्र कळघम आणि तमिळनाडूच्या लोकांनी पिढ्यानपिढ्या चालवलेला भाषा हक्कांचा संघर्ष आता राज्यांच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रात निषेधाच्या वादळासारखा फिरत आहे.
तसेच तामिळनाडूच्या शाळांमध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून शिकवले तरच निधी दिला जाईल असे सांगून बेकायदेशीर आणि अराजकतेने वागणाऱ्या भाजपला लोकांच्या उठावाच्या भीतीने महाराष्ट्रात दुसऱ्यांदा माघार घ्यावी लागली असल्याची चपराक लगावली आहे.
याचदरम्यान, मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी हिंदी लादण्याच्या विरोधात बंधू #उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत झालेल्या विजयी रॅलीतील उत्साह आणि प्रभावी वक्तृत्व आपल्याला प्रचंड उत्साहाने भरून टाकत असल्याची भावनाही व्यक्त केली.
मला चांगलेच माहिती आहे की,पूर्णवेळ हिंदी आणि संस्कृतच्या प्रचाराला प्राधान्य देणाऱ्या केंद्र सरकारकडे श्री. #राजठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे नाहीत: "उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवली जाते?" आणि "हिंदी भाषिक राज्ये मागे आहेत - तुम्ही प्रगतीशील बिगर-हिंदी भाषिक राज्यांच्या लोकांवर हिंदी का लादत आहात? असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
केंद्र सरकार एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत (समाग्र शिक्षा अभियान) २,१५२ कोटी रुपयांचा निधी देण्याचा आपला सूड घेण्याचा दृष्टिकोन बदलेल का, जर तामिळनाडूने तीन भाषांच्या धोरणाच्या नावाखाली हिंदी आणि संस्कृत लादणारे नवीन शिक्षण धोरण स्वीकारले तरच? तामिळनाडूच्या शालेय मुलांच्या शिक्षणासाठी कायदेशीररित्या देणे असलेला निधी ते ताबडतोब सोडेल का? अशी विचारणाही एम के स्टॅलिन यांनी केली आहे.
हिंदी वर्चस्वाविरुद्ध तामिळनाडूच्या लोकांनी सुरू केलेला संघर्ष केवळ भावनिकच नाही तर बौद्धिक देखील आहे!ते तार्किक आहे! ते भारताच्या बहुलवादी संस्कृतीच्या रक्षणासाठी आहे! ते द्वेषाने प्रेरित नाही!हिंदी लादल्यामुळे असंख्य भारतीय भाषा नष्ट झाल्याच्या इतिहासाची माहिती नसलेले आणि भारताला हिंदी राष्ट्रात बदलण्याचा अजेंडा समजून घेण्यात अयशस्वी झालेले काही भोळे लोक "हिंदी शिकल्याने तुम्हाला नोकऱ्या मिळतील"असे वाक्ये बोलतात. त्यांनी आता सुधारणा करावी. महाराष्ट्रातील उठाव त्यांचे शहाणपणाचे डोळे उघडेल!
तमिळसाठी निधी वाटपात होणारा भेदभाव किंवा कीझाडी संस्कृतीला मान्यता देण्यास नकार देण्याचा अहंकार आम्ही चालू ठेवू देणार नाही. भाजपने तमिळ आणि तमिळनाडूशी केलेल्या विश्वासघाताचे प्रायश्चित्त केले पाहिजे. जर नाही तर, तामिळनाडू पुन्हा एकदा भाजप आणि त्यांच्या नवीन मित्रपक्षांना असा धडा शिकवेल जो ते कधीही विसरणार नाहीत! चला, आपण एकत्र येऊया! तामिळनाडू लढेल! तामिळनाडू जिंकेल!असंही शेवटी ट्विटमध्ये स्टॅलिन यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.