

TMC Rebel MPs update : परिसीमन बिलावरून देशाच्या राजकारणात सध्या मोठा घडामोडी घडत आहेत. विरोधी तंबूतील काही पक्षांनी बिलाला पाठिंबा जाहीर केल्याने विरोधकांची ताकद कमी झाली आहे. दुसरीकडे मोदी सरकारकडे आवश्यक संख्याबळ असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच आता या घडामोडींमध्ये आणखी एक ट्विस्ट आला आहे.
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने पक्षाच्या सर्व खासदारांसाठी व्हीप जारी केला आहे. हा व्हीप २० बंडखोर खासदारांनाही लागू असल्याचा दावा या पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. तर रविवारी पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून या खासदारांना मतदानात सहभागी होऊ दिले जाऊ नये, अशी मागणी केली आहे.
व्हीप आणि टीएमसीच्या या मागणीमुळे २० खासदारांबाबतचा संभ्रम वाढला आहे. या खासदारांचा गट काही महिन्यांपूर्वीच एनसीपीआय या पक्षात सामील झाला आहे. मात्र, अद्याप लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या विलीनीकरणावर मोहोर उमटविलेली नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशनामध्ये या खासदारांच्या नावासमोर टीएमसी खासदार असाच उल्लेख होता.
विलीनीकरणाचे हे प्रकरण सुप्रीम कोर्टातही गेले असून त्यावर काही सुनावण्याही झाल्या आहेत. त्याचाच संदर्भ देत बॅनर्जी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, संसदेच्या आगामी अधिवेशनात या २० खासदारांना मतदानाची परवानगी दिली जाऊ नये. कारण त्यांच्याविरोधात अपात्रतेच्या याचिका प्रलंबित आहेत. त्यांच्या स्वतंत्र बैठकव्यवस्थेवर पुनर्विचार करण्याची मागणीही बॅनर्जी यांनी केली आहे.
लोकसभेच्या अधिकृत संकेतस्थळावर अजूनही ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसची सदस्यसंस्था २८ अशी दिसत असून त्यामध्ये एनसीपीआयमध्ये कथितपणे विलीन झालेल्या खासदारांचाही समावेश आहे, असे अभिषेक बॅनर्जी यांनी पत्रात म्हटले आहे.
बॅनर्जी यांच्या या पत्रावर ओम बिर्ला काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. टीएमसीने बजावलेला व्हीप त्यांना लागू होणार की नाही, हा प्रश्नही सध्या अनु्त्तरित आहे. संबंधित २० खासदारांना मतदान सहभागी झाल्यास ते बिलाच्या बाजूने मतदान करतील, हे स्पष्ट आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.