पणजी : गोव्यात (Goa) विधानसभा निवडणुकीमुळे (Assembly Election) राजकारण तापले आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील (BJP) मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांचे तिकिट भाजपने कापले. त्यामुळे उत्पल यांनी भाजपला रामराम करून पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. पर्रीकर यांनी आज पणजीतील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेऊन मोठं पाऊल उचललं आहे.
उत्पल पर्रीकर यांनी आज उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांसह आज पणजीतील महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तिथे त्यांनी पूजा केली आहे. तिथून आता ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना झाले आहेत. या वेळी बोलताना पर्रीकर म्हणाले की, मी येथे देवीचा आर्शीवाद घेण्यासाठी आलो आहे. पणजीतील जनता मला नक्कीच आशीर्वाद देईल, याचा मला विश्वास आहे.
गोव्याचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपची 34 उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली. या यादीत पणजीतून विद्यमान आमदार बाबूश मोन्सेरात यांना भाजपने तिकिट दिले. यामुळे उत्पल पर्रीकर यांना भाजपने डावलल्याचे स्पष्ट झाले. पर्रीकर यांनी मोठा निर्णय घेत भाजप सोडली आहे. त्यांनी भाजपला धक्का दिला असला तरी इतर कोणताही पक्षाकडून लढण्याची ऑफर न स्वीकारता ते अपक्ष लढणार आहेत. त्यामुळे या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Goa Political News)
आता उत्पल पर्रीकर यांनी भाजपला थेट माघारीची ऑफर देऊन धक्का दिला होता. पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा करणाऱ्या पर्रीकरांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी भाजपसमोर त्यांनी एकमेव अट ठेवली होती. ती अट म्हणजे, भाजपने पणजीतून चांगला उमेदवार द्यावा. भाजपने चांगले उमेदवार दिल्यास ते माघार घेतील, असे त्यांनी जाहीरपणे म्हटले होते. भाजप सोडण्याचा निर्णय अतिशय अवघड होता, असेही त्यांनी म्हटले होते. परंतु, भाजपने पणजीतून बाबूश मोन्सेरात यांची उमेदवारी कायम ठेवल्याने पर्रीकर यांनी लढण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. (Utpal Parrikar News Updates)
पणजीच्या जागेवर सध्या भाजपचे आमदार बाबूश मोन्सेरात आहेत. मोन्सेरात यांनी 2017 मध्ये विधानसभा निवडणूक तेथून लढवली होती परंतु, त्यांचा पराभव झाला होता. नंतर 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या 10 नेत्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. नंतर पर्रीकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांनी पणजीवर विजय मिळवला होता. ते आता जागेवर पुन्हा भाजपकडून उमेदवार आहेत. त्यांच्या पत्नी व विद्यमान मंत्री जेनिफर यांना टालगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे. बाबूश यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातही ते आरोपी आहेत.
पर्रीकर हे गोव्याचे मुख्यमंत्री होते तसेच, संरक्षण मंत्रीही होते. पर्रीकर हे तब्बल 25 वर्षे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. आता मतदारसंघावर त्यांचे पुत्र उत्पल यांनी दावा सांगितला आहे. पणजीत मागील दोन महिन्यांपासून ते प्रचार करीत आहेत. त्यांनी मागील आठवड्यात पक्ष नेतृत्वाला थेट धमकीवजा इशारा दिला आहे. आता मागे वळून पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. यामुळे गोवा भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.