पाटणा : बिहारमध्ये (Bihar) विधानसभेच्या पोटनिवडणुकीआधीच भाजपने (BJP) मित्रपक्षाला धक्का देत तीन आमदार फोडले आहेत. आता या पक्षाचा एकही आमदार विधानसभेत नाही. पक्षाचे प्रमुख विधान परिषदेचे सदस्य असून मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. तीनही आमदार गेल्यानं ते मंत्रिपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा होती. पण आता त्यांनी भाजपसमोर न झुकण्याचा निर्णय घेतला आहे.
विकासशील इन्सान पक्षाचे (VIP) प्रमुख मुकेश सहानी (Mukesh Sahani) आता विधीमंडळात एकटे उरले आहेत. बुधवारी आमदार मिस्त्री लाल यादव, राजु सिंग आणि स्वर्ण सिंग या तिघांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चौथ्या आमदाराचा मृत्यू झाला असून त्याच जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. तर सहानी यांची विधान परिषदेची मुदत काही दिवसांत संपत आहे. त्यांना पुन्हा विधान परिषदेत संधी देण्याबाबत भाजपचा नकार असल्याचे बोलले जात आहे.
सहानी यांना मंत्रिपदा कायम राखायचे असल्यास विधान परिषदेचे सदस्य राहावे लागणार आहे. त्यासाठी भाजपचा पाठिंबा गरजेचे आहे. पण भाजपने नकार दिल्याने त्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे ते मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण सहानी यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. नितीश कुमार यांनी मला मंत्रिमंडळात ठेवायचं की नाही, याचा निर्णय घ्यावा. त्यांना हवं असेल तर त्यांनी मला मंत्रिमंडळातून काढून टाकावं, असं म्हणत त्यांनी नितीश कुमार यांच्याकडे चेंडू टोलावला आहे.
दरम्यान, नितीश कुमार यांनीही हात झटकल्याचे समजते. त्यामुळे सहानी यांना पुन्हा विधीमंडळात येण्याची शक्यता धुसर असल्याने त्यांचं मंत्रिपद आणि विधीमंडळातील अस्तित्वही संपुष्टात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप आणि सहानी यांच्यामध्ये वाद वाढण्याचे कारण विधानसभेची पोटनिवडणूक ठरली आहे. बिहारमधील बोचाहा मतदारसंघाची निवडणूक 12 एप्रिल रोजी होणार आहे. सहानी यांच्या पक्षाचे आमदार मुसाफिर पासवान यांच्या निधनामुळे हा जागा रिक्त आहे. या जागेवर भाजपने उमेदवार उभा केल्यानंतर सहानी यांनी नाराजी व्यक्त केली. नितीश कुमार यांच्या माध्यमातून सहानी यांनी भाजपने ही जागा सोडण्याची विनंती केल्याचे समजते. पण भाजप तयार न झाल्याने सहानी यांचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे.
सहानी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही 49 उमेदवार उतरवले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर ते प्रचारसभेत जोरदार टीका करत होते. तेव्हापासूनच बिहारमधील भाजप नेते नाराज होते. आता बिहार पोटनिवडणुकीने त्यात भरच पडली. त्यामुळे भाजपने तीनही आमदार फोडत सहानी यांना झटका दिला. बिहार विधानसभा निवडणुकीआधी सहानी यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.