

West Bengal election result : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे केवळ भारतचे नव्हे तर शेजारील देशांचेही लक्ष लागले आहे. मतदानानंतर आलेल्या बहुतेक एक्झिट पोलमध्ये तृणमूल काँग्रेसला सत्ता मिळणार नाही, राज्यात पहिल्यांदाच भाजपला बहुमत मिळू शकते,असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या एक्झिट पोलचे अंदाज समोर येताच भाजपमध्ये नेते, कार्यकर्ते आनंदित झाले आहेत.
तृणमूलचे नेते एक्झिट पोलचे आकडे फेटाळून लावत असून राज्यात ममता बॅनर्जीच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करत आहे. एकीकडे दावे-प्रतिदावे सुरू असतानाच शेजारील बांग्लादेशात मात्र एक्झिट पोलने खळबळ उडाली आहे. तेथील एका खासदारानेच संसदेत एक्झिट पोलचा उल्लेख करत सरकारला सतर्क केले आहे.
बांग्लादेश एनसीपी पक्षाचे सचिव खासदार अख्तर हुसैन यांनी संसदेत बोलताना म्हटले आहे की, एक्झिट पोलमध्ये भाजपचा विजय दाखविला जात आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यास बेकायदेशीरपणे बांग्लादेशींना परत पाठविले जाईल. त्यामुळे बांग्लादेशात निर्वासितांचा खूप मोठा लोंढा येईल आणि समस्या निर्माण होईल. आपल्यासाठी ही चिंतेची बाब आहे.
भारतातून मुस्लिम स्थलांतरितांना बांग्लादेशमध्ये पाठविले जाणार नाही, याची कोणतीही गॅरंटी नाही. असे झाल्यास बांग्लादेशात स्थलांतरितांचे लोंढेच्या लोंढे येतील, असे अख्तर यांनी म्हटले आहे. भाजपचे खासदार निशीकांत दुबे यांनी अख्तर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट करत तृणमूल काँग्रेसवर टीका केली आहे.
तृणमूल काँग्रेसला मदत करणारे आता हळू-हळू समोर येत असल्याची टीका दुबे यांनी केली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालसह आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही बांग्लादेशी घुसखोरांचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. प्रामुख्याने भाजपकडून सत्ताधारी तृणमूलवर जोरदार हल्ला चढविण्यात आला होता. भाजपची सत्ता आल्यास घुसखोरांना बांग्लादेशात परत पाठविले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या नेत्यांकडून प्रचारसभेत वारंवार सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.