

Shivsena UBT: नॉटरिचेबल झाल्यानंतर चार दिवसांनी ठाकरेंच्या सहाही बंडखोर खासदारांनी समोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता लोकसभा अध्यक्षांनी ठाकरेंच्या प्रतिनिधींना त्यांची बाजू मांडण्यासाठी बोलावलं आहे. यावेळी या बंडखोरांच्या स्वतंत्र गटाला मान्यता देण्यात येऊ नये अशी मागणी ठाकरेंकडून केली जाऊ शकते. पक्षांतरबंदी कायद्याला अनुसरुन यावर आता बिर्ला काय भूमिका घेतात, याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अरविंद सावंत आणि अनिल देसाई या ठाकरेंच्या दोन खासदारांना आज भेटीसाठी बोलावलं आहे. आज संध्याकाळी ५ वाजता ही भेट होणार आहे. यापूर्वीच या दोन्ही खासदारांनी बिर्ला यांना एक पत्र दिलं होतं. त्या पत्रात पक्षांतर बंदी कायद्यानुसार यांच्या गटाला मान्यता देण्यात येऊ नये, त्यांना अपात्र करावं अशी मागणी करण्यात आली होती. या मागणी संदर्भातच आज ओम बिर्ला ठाकरेंची बाजू ऐकून घेणार आहेत. त्यांचे नेमके काय आक्षेप आहेत, त्यांची नेमकी काय बाजू आहे हे यावेळी जाणून घेणार आहेत.
ठाकरेंच्या या सहाही बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्षांपुढे हजेरी लावली असून त्यांना ओम बिर्ला यांनी तुम्ही कुठल्या दबावाखाली हा निर्णय घेतला आहे का? याबाबत त्यांना विचारणाही करण्यात आली होती. या त्यांच्या भेटीचा व्हिडिओ देखील लोकसभा सचिवालयाकडं उपलब्ध असल्याचं कळतंय. त्यामुळं या बंडखोरांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आता ठाकरेंची बाजू ऐकून घेतली जाणार आहे.
दरम्यान, जेव्हा ठाकरेंचे सहा खासदार नॉटरिचेबल झाले तेव्हाच तातडीनं ठाकरेंकडून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यानुसार, त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं. त्याचबरोबर त्यांना पक्षाच्या बैठकीसाठी व्हीपही काढण्यात आला होता. हा व्हीप या बंडखोर खासदारांनी धुडकाऊन लावला आणि त्यांनी हजेरी लावली नाही. त्यामुळं पक्षाच्या व्हीपचा अनादर केल्याप्रकरणी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही ठाकरेंकडून करण्यात आली आहे. आपल्याकडून घेण्यात आलेले हे सर्व निर्णय ठाकरेंच्या पक्षाकडून लोकसभा अध्यक्षांना कळवण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.