

State Bar Council Election Issue : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची निवडणूक एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. सध्या दोन्ही राज्यातील वकिलांची ही निवडणूक असल्याने त्याकडे दोन्ही राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. पण या निवडणुकीत प्रचारानिमित्तानं विविध कामांचं श्रेयवाद उमेदवार वकिलांच्या अंगलट येणार आहे. कारण हे प्रकरण आता सुनावणीसाठी दाखल झालं आहे. पदाचा गैरवापर, न्यायाधीशांसोबतच्या फोटोंचा बार कौन्सिलच्या निवडणूक प्रचारासाठी वापर तसंच कोल्हापूर हायकोर्ट सर्किट बेंच स्वतःच आणल्याची जाहिरातबाजी करणाऱ्या ॲड. संग्राम देसाई यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा साठीची उमेदवारी रद्द करावी. त्यांना बार कौन्सिल सदस्य होण्यास अपात्र जाहीर करावे, अशी मागणी करणारी याचिका ॲड. सिद्धार्थ इंगळे यांनी बार कौन्सिलच्या शिस्तपालन कमिटी समोर दाखल केली आहे.
ॲड. संग्राम देसाई यांनी बार कौन्सिल निवडणुकीसाठी स्वतःचे प्रचारसाहित्य काढले. त्यावर अनेक न्यायाधीशांसोबत स्वतःचे फोटो छापले. हा जाहिरात प्रकार मतदारांना प्रभावित करण्याचा थेट प्रयत्न आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणूक आचारसंहिता नियम 2026 च्या नियम 6.3 व नियम 5.1चे स्पष्ट उल्लंघन संग्राम देसाई यांनी केलेले आहे. तसेच संग्राम देसाई यांनी स्वतःच्या फेसबुक, इंस्टाग्राम अश्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून सुद्धा अशीच बेकायदेशी जाहिरातबाजी केली असल्याचा आरोप ॲड. सिद्धार्थ इंगळे यांनी याचिकेतून केलेला आहे. कोल्हापूर हायकोर्ट सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी सरन्यायाधीश भूषण गवई यांनाच श्रेय देता येईल, परंतू सर्किट बेंच स्वतःच आणले. याचे श्रेय ॲड. संग्राम देसाई घेताना दिसतात, असं निरीक्षण नोंदविण्यात आलेले आहे. बार कौन्सिल निवडणुकीला शक्ती संपादनाच्या अनैतिक स्पर्धेचे स्वरूप देणे दुर्दैवी असल्याचं ॲड. सिद्धार्थ इंगळे म्हणाले.
ॲड. संग्राम देसाई यांची उमेदवारी रद्द करावी त्यांना बार कौन्सिलची निवडणूक लढविण्यास अपात्र करावं अशी मागणी ॲडव्होकेट अॅक्टच्या कलम 35 नुसार मान्य होण्यासारखी असल्याने संग्राम देसाई यांचे निवडणूक लढविणे धोक्यात आलेले आहेच, शिवाय त्यांच्यासोबत पॅनल करणाऱ्यांचे अस्तित्व सुद्धा धोक्यात आलेले आहे. या तक्रार पिटिशनवर लवकरच सुनावणी होईल. बार कौन्सिलचा एक माजी अध्यक्षच नैतिकता पाळू शकला नाही व निवडणूक आचारसंहिता भंग करतोय यातून पदामुळे आलेली गुंडप्रवृत्ती, कायदेशीर प्रक्रियेबाबत बेदरकारपणा दिसतो असे तक्रारदार सिद्धार्थ इंगळे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.