Kolhapur News: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची 'ईडी'कडून चौकशी सुरू झाली आहे. गेल्या दीड महिन्यात मुश्रीफांवर ईडीने आज तिसऱ्यांदा कारवाई केली. दरम्यान, शुक्रवारी (ता. १०) उच्च न्यायालयाने हसन मुश्रीफांना दिलासा दिला होता. त्यानंतर आज पहाटेपासूनच 'ईडी'ने तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांसह मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
'ईडी'ने शनिवारी (ता. ११) पहाटे पाच वाजताच हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल येथील निवासस्थानी छापा टाकला. दरम्यान मुश्रीफ हे घरी नसून ते मुंबईला असल्याची माहिती आहे. 'ईडी'च्या पथकाने घराची झडती घेऊन कुटुंबीयांचीही चौकशी केली. ही तपासणी तब्बल साडेनऊ तास सुरू होती. दरम्यान, घराबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तेथे त्यांनी किरीट सोमय्याविरोधात घोषणा दिल्या. दरम्यान मुश्रीफांच्या पत्नी सायरा यांनी आक्रोश व्यक्त केला. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहनही केले.
हसन मुश्रीफ (Hasam Mushrif) यांच्यावरील आजची ही दीड महिन्यातील तिसरी कारवाई आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने त्यांना शुक्रवारीच दिलासा दिला आहे. मुश्रीफांवर पोलिसांनी २४ एप्रिलपर्यंत कठोर कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारी मुश्रीफांच्या कागल येथील घरी 'ईडी'ने धाड टाकली. त्यावेळी कुटुंबीयांच्या चौकशीसह घराचीही तब्बल साडेनऊ तास तपासणी केली. त्यानंतर 'ईडी'चे पथक काही कागदपत्रांसह घराबाहेर पडले.
मुश्रीफांवर हे आहेत आरोप
मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी केलेल्या आरोपांनंतर कारवाई सुरू झाली आहे. मुश्रीफ यांनी १५७ कोटींच मनी लॉन्ड्रिंग केले, अप्पासाहेब नलावडे कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला, मुश्रीफांनी निकटवर्तीयांसाठी कारखाना खरेदी केला, साखर कारखाना खरेदी करताना काळा पैसा गुंतविला, ग्रामविकास विभागाचे टेंडर जावायाला देऊन १५०० कोटींचा घोटाळा केल्याचे आरोप आहेत.
दरम्यान, आज अचानक 'ईडी'चे अधिकारी आल्याने मुश्रीफांच्या पत्नी सायरा यांनी संताप व्यक्त केला. त्यांना अश्रू अनावर झाले. "ईडीचे अधिकारी अजून आम्हाला किती त्रास देणार? असा त्रास देण्याऐवजी आम्हाला गोळ्या घाला," असे सांगत सायरा भडकल्या. दरम्यान मुश्रीफ यांच्या घराजवळ कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्यांनी सायरा मुश्रीफ यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकार, राष्ट्रीय तपास यंत्रणा यांच्याविरोधात मुश्रीफ समर्थकांनी घोषणाही दिल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.