Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता राज्यातील चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आघाडी व महायुतींमधील तिन्ही पक्षांनी निश्वास सोडला आहे.
काही ठिकाणी मात्र बंडखोरी कायम असल्याने महाविकास आघाडी व महायुतीपुढील डोकेदुखी वाढली आहे. त्यातच सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांनी निवडणूक रिंगणातून माघार न घेतल्यास कारवाईचा इशारा दिला होता. त्यानुसार मंगळवारी उद्धव ठाकरेंनी या 5 नेत्यांची हकालपट्टी केली आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटातून या पाच नेत्यांना निलंबित करण्यात आले आहे. माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगूल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
काल इशारा, आज कारवाई
सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी शिवसेना (Shivsena) ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी आम्ही आमच्या नेत्यांना उमेदवार मागे घेण्यासाठी सांगितलं आहे. मात्र तरिही त्यांनी अर्ज मागे घेतला नाही. तर त्यांच्यावर पक्ष कडक कारवाई करेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानुसार आता ठाकरे गटाच्या नेत्यांवर कारवाई करण्यात आली.
या नेत्यांवर करण्यात आली कारवाई
यवतमाळ जिल्ह्यातील विश्वास नांदेकर – जिल्हाप्रमुख वणी विधानसभा, चंद्रकांत घुगूल झरी तालुकाप्रमुख, संजय आवारी – मारेगाव तालुकाप्रमुख, प्रसाद ठाकरे वणी तालुकाप्रमुख यांचीही हकालपट्टी करण्यात आली. या मंडळींची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली.
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या मतदारसंघात बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐनवेळी त्यांनी अर्ज मागे घेतला. मात्र, अर्ज मागे घेतल्यानंतर सुद्धा पक्ष विरोधी वक्तव्य केली आणि पक्ष विरोधी कारवाया केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.