
Nagpur News : राज्यात सध्या राजकीय घडामोडी मोठ्या वेगाने घडत आहेत. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवस अनुपस्थितीत असल्याने चर्चांना उधाण आले होते. राज्य मंत्रीमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात न आल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे समता परिषदेचा मेळावा घेत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे भुजबळ यांची भेट घेऊन समजूत काढणार असल्याचे समजते. (Chhagan Bhujbal News)
नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशेनला गेल्या तीन दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नसल्याने वेगळीच चर्चा रंगली आहे. दुसरीकडे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची नाराजी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. नाशिक येथील समता परिषदेच्या मेळाव्याप्रसंगी भुजबळ यांनी अजित पवारांचे नाव न घेता टीका केली.
यावेळी भुजबळ म्हणाले, 'प्रश्न मंत्रीपदाचा नाही पण अवहेलना केल्याचे शल्य आहे. मी मुंबईला जाणार असून ओबीसींच्या नेत्यांना भेटणार व चर्चा करणार, राज्यातील इतर नेत्यांशी चर्चा करुन पुढचं पाऊल उचलणार आहे. घाई करुन चालणार नाही विचारपूर्वक निर्णय घेणार असल्याचे भुजबळ म्हणाले. अजित पवार म्हणाले आपण बसून चर्चा करु, अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचे भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्यानंतर बुधवारी दुपारी प्रसार माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे येत्या काळात अजित पवार व भुजबळ भेट होणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
गेल्या काही दिवसापासून भुजबळ यांच्या अडून काही उतावीळ झालेल्या कार्यकर्त्यांनी आमच्या पक्ष नेतृत्वावर टीका केली आहे. त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. कोणाकडूनही उद्दामपणा खपवून घेतला जाणार नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहेत. त्यांच्या फोटोला जोडे मारण्याची हिंमत कोणी करीत असेल तर त्याचे उत्तर त्यांना त्याच पद्धतीने दिले जाईल, असा इशाराही अमोल मिटकरी यांनी यावेळी दिला.
राज्य मंत्रीमंडळाचे खातेवाटप अजित पवार यांच्यामुळे रखडलेले नाही. अजितदादांची तब्येत ठीक नसल्याने ते अधिवेशनाला आलेले नाहीत. त्यासाठी वेगळे कारण जोडू नये. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्यामुळे मंत्रिमंडळाचे खातेवाटप रखडलेले नसल्याचे मिटकरी यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.