

Ashish Shelar on Savarkar : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच सर्वच युत्या-आघाड्यांमधील घटकपक्ष हे स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहेत. त्यामुळं राज्य सरकारमध्ये सत्तेत एकत्र असले तरी महापालिका निवडणुकांदरम्यान ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भाजपचे नेते आणि राज्याचे सांस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे. तुम्हाला सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील, अन्यथा पर्यायही त्यांनी सांगून टाकला आहे. त्यांच्या या विधानाला राष्ट्रवादीनं देखील प्रत्युत्तर दिलं आहे, पण यामुळं महायुतीला आदरे बसत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
एका प्रचार यात्रेदरम्यान, आशिष शेलार पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, "भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणालेच आहेत की आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत. सावरकरी विचारांवर चालणारे लोक आहोत. त्यामुळं अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील आणि आमचे विचार असे आहेत की याल तर तुमच्याबरोबर नाही याल तर तुमच्याशिवाय आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचं काम करत राहू"
दरम्यान, राष्ट्रवादीकडून अमोल मिटकरी यांनी आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ट्विटद्वारे मिटकरींनी सावरकारांच्या मुद्द्यावर आपल्या पक्षाची भूमिका मांडली. त्यांनी म्हटलं, "प्रिय आशिष शेलार, दादा व दादांचा पक्ष तुमच्या 'आदर्शां'च्या नेतृत्वार चालला पाहिजे, हा जो तुमचा आट्टाहास आहे त्यात कितपत तथ्य आहे हे तुम्हालाच माहिती. आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर चळवळीशी बांधील व प्रामणिक होतो, आहोत आणि राहू. तुम्हाला अपेक्षित असलेली विचारधारा जरी आम्ही स्विकारत नसलो तरी आमच्या पक्षांची आंबेडकरी विचारधारा तुम्हाला नाईलाजाने का होईना स्विकारावीच लागते हे त्रिवार सत्य आहे.
पुढे एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना मिटकरी म्हणाले, "ही ठणकवण्याची भाषा असू शकत नाही. सावरकरांचा विज्ञानवाद आशिष शेलारांना मान्य आहे का? त्यांनी आमच्यावर कुठला विचार लादण्याचा प्रयत्न करु नये, आम्हीही आमची विचारधारा त्यांच्यावर लादत नाही. ज्यावेळी महायुतीत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला तेव्हा आम्ही आमचा विचार मांडला आहे. आशिष शेलार एक सुसंस्कृत मंत्री आहेत, आम्ही त्यांना एवढंच सांगतो की आदर्शांचं नेतृत्व तुम्ही लादलं पाहिजे हा तुमचा अट्टाहास आहे, हे ते ठासून सांगत आहेत. त्यात तथ्य आहे की नाही हे त्यांनाच माहिती.
पण आम्ही एवढंच सांगतो की शिव-फुले-शाहू-आंबेडकर या विचारांवर त्यांना चालावंच लागतं. हा विचार जर त्यांनी सोडला तर कदाचित त्यांची ओळख पुसली जाईल. त्यामुळं नाईलाजानं का होईना शिव-फुले-शाहू-आंबेडकर त्यांना स्विकारावेच लागतात. आम्ही तो विचार स्विकारावा की नाही हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे, तसंच हा ही तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. रविंद्र चव्हाणांना आम्ही समजावून सांगितलं होतं की, अशी भाषा करु नका. जर तुम्ही महायुतीचा धर्म पाळतच नसाल तर कशाला विनाकारण वितुष्ट यावं. पण अशा पद्धतीनं महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान असा मुद्दा काढायचा, ज्यामुळं वाद होऊ शकतो. डिवचायचं मग त्यावर राष्ट्रवादी प्रतिक्रिया देतेय का? हे पाहायाचं, यात ते नापास झाले आहेत"
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.