

Devendra Fadnavis Pune News: पौराणिक कथांमध्ये आपल्याला पाताळलोकच वर्णन नेहमीच ऐकायला मिळतं, या पाताळलोकमध्ये राक्षसांचं राज्य असतं. पण हे पाताळलोक सध्याच्या निवडणुकांच्या धामधुमीत पु्न्हा एकदा चर्चेत आलं आहे. पुण्यातल्या प्रचार सभेमध्ये आपण पाताळलोक निर्माण करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. पण म्हणजे मुख्यमंत्र्यांना नेमकं काय करायचंय? असा प्रश्न आता पुणेकरांना पडला आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांकडून आश्वासनांची खैरात आणि एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप व्हायला लागले आहेत, त्यामुळं निवडणुकीला आता रंगत यायला सुरुवात झाली आहे. पुणे महापालिकेचा सामना हा महायुती विरोधात महाविकास आघाडी असा होईल, असं वाटत असतानाच महायुतीतील दोन पक्षच एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाजपच्या स्थानिक नेत्यांवर टीका करत असताना दुसरीकडे भाजप नेते देखील अजित पवारांवर पलटवार करताना दिसत आहेत. त्यातच फडणवीसांनी आपल्या सभेत भाजपच्या सत्ता काळात पुण्याचा विकास कशा पद्धतीने झाला याबाबतची माहिती दिली. तसंच भूतकाळामध्ये राज्यकर्त्यांनी कशा प्रकारच्या चुका केल्या होत्या त्याचा पुणेकरांना कसा त्रास होतोय, हे देखील सांगण्याचा प्रयत्न केला.
भविष्यातील पुणेकरांसाठीचं व्हिजन यावेळी फडणवीसांनी या सभेत मांडलं. फडणवीस म्हणाले, पुण्यामध्ये वाहतूक कोंडीची समस्या बिकट झाली आहे. दरवर्षी तीन ते चार लाख गाड्या या नव्याने पुणे शहरात वाढत आहेत. त्यामुळे पुण्यातला ट्राफिक हे कासवाच्यागतीने पुढे जात असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात सर्वात कमी रस्ते हे पुण्यामध्ये आहेत. शहरात केवळ 9 टक्केच रस्ते आहेत इतर शहरांचा विचार केलात तर तिथं 22 टक्क्यांपर्यंत रस्ते पाहायला मिळतं. पुणे शहराच्या रस्त्याचे नियोजन कोणी केलं? या राजकारणात मला पडायचं नाही असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला.
त्याचबरोबर पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आपण मोठा प्लॅन केला आहे. एकीकडे मेट्रोचं जाळं वाढवायचं तसंच रस्ते मोठे करून पुलांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. मात्र, उत्तर दक्षिण पुण्यात जाण्यासाठी रस्ते अत्यंत छोटे आहेत. त्यामुळं पुण्याचे ट्राफिक नियंत्रण करण्यासाठी आम्ही पाताळलोक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, असं फडणवीसांनी सांगताच उपस्थित लोकही आश्चर्यचकीत झाल्याचं पाहायला मिळालं.
याचं स्पष्टीकरण देताना फडणवीस पुढे म्हणाले, पाताळलोक तयार करणार म्हणजेच रस्ते तयार करण्यासाठी आता जमिनीवर जागा उरलेली नाही तसंच आकाशातही जागा नाही. त्यामुळं आता जमिनीखाली जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळं पुण्याचं ट्रॅफिक चांगलं करण्यासाठी आम्ही पाताळात जाणार आहोत. त्यामुळं 54 किलोमीटरचे टनेल्स म्हणजेच पातळीतले बोगदे तयार करणार आहोत. त्याची सुरुवात कात्रजपासून करणार आहोत असं फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर पुण्यात मात्र पाताळलोकचीच चर्चा सुरु होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.