

Ratnagiri News : राज्यातील वातावरण सध्या भोंदूबाबा अशोक खरात यांचे एकानंतर एक कारनामे समोर येत असल्याने चांगलेच तापले आहे. या सर्व प्रकारामुळे राज्यभरात खळबळ माजली असतानाच विरोधकांनी केलेल्या आरोपामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता आरोपांच्या फैरी थांबण्याचे नाव घेत नाहीत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आता या प्रकरणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणाचा खुलासा राज्य सरकारला करावा लागणार आहे. सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत आले असल्याने येत्या काळात या प्रश्नावरून सरकारला घेरण्याची संधी विरोधकांच्या हाती आली आहे.
गेल्या दोन दिवसापासून राज्यभरात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणावरुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) परखड विधान केले. 'पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या,' असे म्हणत सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली. असतानाच या प्रकरणी आता आमदार भास्कर जाधव यांनीही अनेक दावे करीत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
याबाबत बोलताना भास्कर जाधव (Bhaskar jadhav) म्हणाले, 'रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला ते चांगलेच झाले, पण केवळ त्यांच्यापर्यंतच हे प्रकरण नाही. याप्रकरणात अनेक उच्चपसदस्थ अधिकारी आहेत. अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वीच SIT नेमण्यात आली आहे. मात्र, निम्मे मंत्रिमंडळ यात असल्याने हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचे नव्हते. केवळ पत्रकार आणि पीडित महिलेमुळे हे प्रकरण बाहेर आले, अन्यथा हे प्रकरण सरकारने प्रकरण दाबले असते, असा गौप्यस्फोट भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे.
याप्रकरणी SIT कधी नेमली याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अधिवेशन काळात सरकारने याबाबत वस्तुस्थिती मांडणे गरजेचे होते. कारण, यात फक्त रुपाली चाकणकर आणि राजकीय पुढारी आहेत असे नाही, यात उच्चपदस्थ अधिकारी देखील असून अशोक खरातची उठबस करण्यात ते गुंतले आहेत. केवळ चाकणकर यांचा राजीनामा झाला म्हणजे प्रकरण संपले असे समजू नये. सरकारमधले अनेक मंत्री आणि अधिकारी यात असल्याने हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न होत असल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले.
खरात प्रकरणात आता एसआयटी नेमल्याचे सांगितले जात आहे, पण अधिवेशनाच्या आधी SIT नेमली आहे. मात्र, निम्मे मंत्रिमंडळ यात असल्याने हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचे नव्हते. केवळ पत्रकार आणि पीडित महिलेमुळे प्रकरण बाहेर आले अन्यथा हे प्रकरण सरकारने प्रकरण दाबले असते. या प्रकरणात आयएएस, IPS अधिकारी आहेत. हे प्रकरण पोलिसांना देखील माहित होते, म्हणून हे प्रकरण बाहेर आले नाही, असा खळबळजनक दावा भास्कर जाधव यांनी केला आहे. त्यामुळे, हे प्रकरण तडीस जावे यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे.
राज्य सरकारची एकूण वृत्ती पाहून काही पुढारी आणि अधिकाऱ्यांच्या फाईल्स दाबून ठेवून ते राजकीय फायद्यासाठी वापरतील, असा दावाही भास्कर जाधव यांनी केला आहे. राजकीय पुढाऱ्यांना अघोरी विद्या आणि अघोरी प्रकार कशाला लागतात हे कळत नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन असे शेण खाणाऱ्या लोकांना चांगला धडा शिकवला पाहिजे. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे करतो आणि दुसऱ्या बाजूला काय सुरू आहे याचा विचार करणे गरजेचे असल्याचेही मत भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत मांडले.
नाशिकमधले प्रकरण कळायला एवढा उशीर का?
भोंदू बाबाच्या या प्रकरणाचे धागेदोरे खोलवर गुंतले आहेत. राज्यकर्त्यांकडून अनेकांना पाठिशी घालून गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देण्याचे काम सुरू आहे. पावसाळी अधिवेशनातच नाशिकमधील हॉटेलचा उल्लेख झाला तेव्हा राज्यकर्त्यांनी मागचा पुढचा विचार न करता प्रकरणाला क्लीन चिट दिली. नाशिकमधले प्रकरण कळायला एवढा उशीर का? असा सवालही जाधव यांनी केला. या सर्व प्रकरणामुळे येत्या काळात अधिवेशनात विरोधकांकडून राज्य सरकारला धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.