

राज्यातील विस्तारित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय उपचारांच्या दाव्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. 2024 ते 2026 या कालावधीत तब्बल 15,407 संशयास्पद प्रकरणे प्रथमदर्शनी समोर आल्यानंतर राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या तपासासाठी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली असून, आरोग्य योजनांतील आर्थिक गैरव्यवहार, बनावट दावे आणि प्रक्रियेमधील त्रुटींचा सर्वंकष तपास केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत या कथित फसवणुकीची व्याप्ती एका जिल्ह्यापुरती मर्यादित नसून अनेक जिल्ह्यांमध्ये पसरल्याचे निदर्शनास आले होते.
जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात येणारी पडताळणी अपुरी ठरत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय एसआयटीमार्फत स्वतंत्र चौकशी करण्याचे निर्देश दिले. एसआयटी रुग्णालयांमध्ये झालेल्या अनियमिततेबरोबरच योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या थर्ड पार्टी एजन्सी, जिल्हा समन्वयक तसेच संबंधित इतर घटकांची भूमिकाही तपासणार आहे.
तपासादरम्यान रुग्णालयांच्या मान्यता प्रक्रियेत झालेल्या त्रुटी, उपचारांच्या दाव्यांना मंजुरी देण्याची पद्धत, देखरेख यंत्रणेतील कमतरता आणि भविष्यात अशा प्रकारचे गैरप्रकार रोखण्यासाठी आवश्यक सुधारणा याबाबतही एसआयटी शिफारसी करणार आहे. या समितीला 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे अंतिम अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. त्यामध्ये बनावट किंवा वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक नसलेले उपचार दाखवून दावे सादर करणे, उपचारांची श्रेणी कृत्रिमरीत्या वाढवून अधिक निधी मिळवण्याचा प्रयत्न, रुग्णालयांच्या अंगीकरण व नूतनीकरण प्रक्रियेत अनियमितता, रुग्ण नोंदणीसाठी अनधिकृत मध्यस्थांचा वापर, एकाच मोबाईल क्रमांक किंवा ओळखपत्राशी अनेक दावे जोडणे तसेच मोठ्या प्रमाणावर संशयास्पद रुग्ण नोंदणी झाल्याचा समावेश आहे.
एसआयटीच्या सदस्यांमध्ये ई. रवींद्रन (सचिव-2, सार्वजनिक आरोग्य विभाग), वीरेंद्र सिंह (सचिव, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग), सायबर पोलीस ठाणे, नाशिक शहर येथील पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त तसेच आरोग्य विभागाचे उपसचिव सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.