

Bhimashankar VIP Darshan Pune News : श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर हे गेले अडीच महिन्यांपासुन सर्व सामान्य भाविक भक्तांसाठी बंद असताना झारखंड राज्यातील खासदार डॉ. निशिकांत दुबे यांच्यासाठी मंदिर खुले करण्यात आल्याने भाविक भक्तांकडुन तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हे दर्शन आज (ता 14 ) दुपारी दोनच्या दरम्यान घेण्यात आले आहे. महाशिवरात्रीलाही येथे दर्शनासाठी मंदिर बंद असल्याचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांनी स्वीकारला होता. परंतु या आगळ्यावेगळ्या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिक प्रशासनाविरुद्ध तीव्र नापसंती व्यक्त करत आहेत. महादेवाच्या मंदिरामध्ये असा दुजाभाव का असा प्रश्न आता पडू लागला आहे.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरातील सभामंडप व पायरी मार्गाचे बांधकाम सुरू आहे. भाविकांची सुरक्षितता अबाधित राखण्याबरोबरच कामे नियोजनबद्ध व कालमर्यादेत पूर्ण करण्याच्यादृष्टीने मंदिर हे 9 जानेवारी 2026 पासून तीन महिन्यांसाठी जिल्हाधिकारी यांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याला स्थानिक नागरिक, भाविक भक्त व सर्व पक्षीय पदाधिकऱ्यांनी संमती दिली होती.
तेव्हापासून गेले अड्डीच महिने झाले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी कोणालाही सोडले जात नाही. तप अनुष्ठाने करून हजारो किलोमीटर पायी वारी तसेच सायकलवारी करत येणार्या भाविक सुद्धा दर्शन घेऊ दिली जात नाही. हजारो किलोमीटर येऊनही त्यांना दर्शन न घेता पुन्हा परतावे लागत असताना मात्र हेलिकॉप्टरने आज आलेले खासदार डाॅ. निशिकांत दुबे यांना व्हीआयपी सेवा पुरवून यांच्यासाठी मंदिर खुले करुन व्हीआयपी दर्शन दिले.
खासदार डाॅ. निशिकांत दुबे हे झारखंड राज्यातील गोड्डा लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते निकटवर्तीय म्हणुन समजले जातात. खासदार डाॅ. निशिकांत दुबे यांच्यासाठी मंदिर खुले करण्यात आल्याने श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरामध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.
पवित्र अशा महाशिवरात्रीला आठ दिवस मंदिर खुले करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले होते, मात्र या मंदिर परिसरामध्ये चालू असलेल्या कामांमुळे पवित्र अशा महाशिवरात्रीच्या दिवशीही मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. हा निर्णय सर्वसामान्य भाविक भक्तांनी ही मोठ्या मनाने स्वीकारला होता.
मात्र एका व्हीआयपी नेत्यासाठी मंदिर खुले करण्यात आल्याने प्रशासनाबाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. ह्या व्हीआयपी दर्शनाची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले ,याबाबत मला कोणतीही माहिती नाही. प्रशासनाने दर्शनासाठी कोणतीही परवानगी दिलेली नव्हती.
निशिकांत दुबे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात गेल्या वर्षी जुलैमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले. महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध दुबे यांनी केला होता. दुबे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर "हम मराठी लोगों को यहां पर पटक-पटक कर मारेंगे." असं वादग्रस्त विधान दुबे यांनी केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.