Maharashtra News: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. ईडीकडून याप्रकरणी आता आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राज्याचे विरोेधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांशी संबंधित कंपनीविरोधात हे आरोपपत्र आहे. मात्र, ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात अजित पवारांचं नाव नाही. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच ईडीकडून या प्रकरणी अजित पवारांना क्लिनचीट मिळाली का अशी चर्चा सुरु आहे.
ईडीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी पुरवणी आरोपपत्रं दाखल केलं आहे. या घोटाळ्याप्रकरणी जरंडेश्वर साखर कारखान्याची 65.75 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. 2021मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. या घोटाळ्यात स्पार्कलिंग सॉइल लिमिटेड या कंपनीचं नाव समोर आलं होतं. ही कंपनी अजित पवार(Ajit Pawar) आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचं सांगितलं जात होतं. आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने पुरवणी आरोपपत्रं दाखल केलं आहे.
येत्या 19 एप्रिलला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यावेळी न्यायालय काय प्रश्न करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचवेळी ईडी(ED)नं या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे, गरज पडल्यास आम्ही पुन्हा पुरवणी आरोपपत्र दाखल करू असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण ?
ईडीच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2019मध्ये दाखल झालेल्या एका प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशी सुरू केली होती. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कायद्याचं पालन न करता एक साखर कारखाना कमी किमतीत आपल्या नातेवाईक आणि मित्रांना विकला होता.
हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आणि ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाण्याला 2010मध्ये गुरु कमोडिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडला 65.75 कोटी रुपयाला विकल्याचं या चौकशीतून निष्पन्न झालं होतं.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.