
थोडक्यात बातमीचा सारांश :
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधकांवर हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणाचा वापर करून युती सरकारला बदनाम करण्याचा आरोप केला आहे.
त्यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं पण त्याचा राजकीय वापर करून फेक नॅरेटिव्ह तयार करणं म्हणजे "मृताच्या टाळूवर लोणी खाणं" असल्याचं मत व्यक्त केलं.
राजकीय फायद्यासाठी अशा घटनांचा वापर होणं अत्यंत गैर असल्याचं ते म्हणाले आणि पोलीस तपासातच सत्य बाहेर यावं अशी अपेक्षा व्यक्त केली.
Mumbai News : सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत काम करूनही शासनाने सुमारे दीड कोटी रुपयांचे देयक थकीत ठेवल्याने एका कंत्राटदाराला आत्महत्या करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार सांगली येथे उघड झाला आहे. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली असून विरोधकांनी यावरून महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. महायुती सरकारवर आरोप केले जात आहेत. या आरोपांनंतर आता भाजपने घणाघमाती टीका करताना विरोधकांवर निशाना साधला आहे. विरोधक या प्रकरणावरून युती सरकारला बदनाम करायचं काम करत असून पुन्हा फेक नॅरेटीव तयार केला जातोय. विरोधक मृताच्या टाळूवर लोणी खाण्याचा प्रकार करत असल्याची टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडीसह इतर पाच ठिकाणी हर्षल पाटील याने सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून जलजीवन मिशन अंतर्गत काम केले होते. तर तांदुळवाडीतील काम हर्षल पाटील याने त्यांचे बंधू अक्षय पाटील यांच्या नावे घेतले होते. चार ठिकाणी 100 टक्के काम पूर्ण झाले असून दोन ठिकाणी 10 आणि 20 टक्के काम शिल्लक आहे. पण कामे पूर्ण होऊनही जिल्हा परिषदेकडून 1 कोटी 47 लाखांची देय थकवण्यात आली. त्यामुळे हर्षल पाटील याच्यावर 65 लाखांपेक्षा जास्त रक्कमेचं कर्ज झाले होते. याच कर्जामुळे आणि शासनाने देय रक्कम न दिल्याने मंगळवारी (२२ जुलै) त्यांच्याच शेतात गळफास घेत आत्महत्या केली आहे. यामुळे आता विरोधकांसह राज्य कंत्राटदार संघटनेने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच या प्रकरणात सरकारच जबाबदार असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान या प्रकरणात आता भाजपने उडी घेतली असून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधकांवर बोचरी टीका केली आहे. उपाध्ये यांनी, हर्षल पाटील सारख्या तरुणाचा मृत्यू हा दैुर्दैवी आहे. अशा पद्धतीने कोणाही तरूणावर अशी आत्महत्या करायची वेळ येऊच नये. त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. पण या निमित्ताने तातडीने महाराष्ट्रातील युती सरकारला बदनाम करायचे काम आता विरोधक करत आहेत. पुन्हा एकदा राज्यात फेक नॅरेटीव निर्माण केलं जात आहे. विरोधकांकडून अशा पद्धतीने कारस्थान केले जाणे म्हणजे मृताच्या टाळूवर लोणी खाण्याचा प्रकार असल्याची टीका उपाध्ये यांनी केली आहे.
तसेच उपाध्ये यांनी, ज्या जलजीवन योजनेचा उल्लेख विरोधक करत आहेत, त्या सांगली जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत 954 कोटींची कामे सुरू आहेत. त्यापैकी 481 कोटींची देयके सादर झाली आहेत. त्यापैकी 462.72 कोटींची रक्कम संबंधितांना दिली गेली आहे. म्हणजे सरकार पातळीवर ना निधी देण्यास विलंब झाला ना योजना रखडल्या आहेत. विरोधकांना सरकार चुकेल तिथे टीका करायचा अधिकार पण फेक नॅरेटीवचा आधार कशाला? असाही सवाल उपस्थित केला आहे.
दरम्यान हर्षल पाटील यांच्या आत्महत्येबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजितदादा आणि गुलाबराव पाटील यांनी, हर्षल पाटील यांचे कोणतेच बील थकीत नसून त्याला जिल्हा परिषदेकडून कोणतेही काम देण्यात आलेले नाही असा खुलासा केला आहे. यामुळे आता राज्य कंत्राटदार संघटना चांगलीच आक्रमक झाली असून शासनाने पैसे अडवल्यानेच आर्थिक विवेचना निर्माण झाली आणि त्यातूनच हर्षल पाटील याने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप राज्य कंत्राटदार संघटनेने केला आहे.
पडणारे प्रश्न :
1. केशव उपाध्ये यांनी काय म्हटलं आहे?
– त्यांनी विरोधकांवर हर्षल पाटील आत्महत्येचं राजकीय भांडवल केल्याचा आरोप केला आहे.
2. फेक नॅरेटिव्ह म्हणजे काय?
– घटनेचा चुकीचा अर्थ लावून सरकारवर टीका करणे आणि जनतेत चुकीचा संदेश पसरवणे हे फेक नॅरेटिव्ह असल्याचं भाजपचं म्हणणं आहे.
3. हर्षल पाटील कोण होते?
– ते सांगली जिल्ह्यातील सरकारी सब-कॉन्ट्रॅक्टर होते, जे जलजीवन मिशनमध्ये काम करत होते.
4. भाजपने या प्रकरणात सरकारचा बचाव का केला?
– भाजपच्या मते हर्षल पाटील यांचा शासनाशी थेट संबंध नव्हता आणि घटनेचा वापर करून सरकारला बदनाम केलं जातंय.
5. पुढील काय होणार आहे?
– सध्या पोलीस तपास सुरू असून तपासात सत्य बाहेर येईल असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.