

Mumbai News : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत येऊन जवळपास 20 महिन्याचा कालावधी झाला आहे. मात्र, अद्याप महामंडळांवरील नियुक्त्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे लक्ष या निवडीकडे लागले असतानाच आता आनंदाची बातमी आहे. येत्या आठ दिवसात भाजपचे पालकमंत्री असलेल्या 19 जिल्ह्यांमध्ये विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची धडक नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासोबतच जिल्हास्तरीय शासकीय समित्यांवरील कार्यकर्त्यांच्या (अशासकीय सदस्य) नियुक्तीचा मार्गही मोकळा झाला आहे. पहिल्या टप्यात भाजपचे पालकमंत्री असलेल्या 19 जिल्ह्यांमधील नियुक्त्या तातडीने करण्यात येणार आहेत, तसे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
भाजपच्या प्रदेश कार्यालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समितीने जिल्हा समित्या आणि विशेष कार्यकारी दंडाधिकारी (एसईओ) यांची नावे निश्चित केली आहेत. त्यामुळे या पदावर आता थेट कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. फायनल करण्यात आलेली ही यादी येत्या एक-दोन दिवसात पालकमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर ही नियुक्ती केली जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत मंत्री बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या सेनेच्या याद्या अद्याप तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या जिल्हास्तरीय समित्यावर करण्यात येणार नियुक्ती
35 जिल्हास्तरीय शासकीय समित्या अशा आहेत. ज्यावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली जाते. त्यात जिल्हा नियोजन समिती, जिल्हा दक्षता समिती, महात्मा गांधी तंटामुक्त समिती, दुष्काळ निवारण समिती, अल्पसंख्याक कल्याण समिती, खनिज प्रतिष्ठान व्यवस्थापन समिती, अवैध दारू प्रतिबंध समिती, रोजगार हमी समिती, आरटीओ समित्या आदींचा समावेश आहे.
प्रत्येकी दोन-दोन मंत्र्यांची समन्वय समिती
महामंडळ, विशेष कार्यकारी दंडाधिकारी (एसईओ), जिल्हास्तरीय शासकीय समित्यांवरील नियुक्तीसाठी महायुती सरकारने समन्वय समिती नेमली आहे. या समितीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन-दोन मंत्री आहेत. या दोन-दोन मंत्र्यांच्या समन्वय समितीने नियुक्तीचे सूत्र आधीच ठरवले असल्याचे समजते.
महायुतीचा फॉर्म्युला
तालुकास्तरावर नियुक्ती करीत असताना आमदार असलेल्या पक्षाला 60 टक्के जागा देण्यात येणार आहेत. तर अन्य दोन पक्षाना 20-20 टक्के पदे वाटून देण्यात येणार आहेत. ज्याठिकाणी महायुतीचा आमदार नाही त्याठिकाणी निवडीचा फॉर्म्युला भाजपला 40 टक्के तर राष्ट्रवादी काँग्रेस व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 30-30 टक्के जागा वाटप करण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्राने दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.