शिवसेना आमदाराच्या बालेकिल्ल्यात भाजप आमदार अन् CM फडणवीसांच्या खासगी सचिवांचा ‘पॉवर शो’; ‘बाप तो बाप रहेगा’ म्हणत, धनुष्यबाण दाखवत इशारा

Political News : रॅलीदरम्यान ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर दोघांनी ठेका धरला. मात्र, या सगळ्यात आमदार श्वेता महाले यांनी हातात धनुष्यबाणाचे चिन्ह दाखवल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
shweta mahale, vidhydhar mahale, devendra fadnavis
shweta mahale, vidhydhar mahale, devendra fadnavisSarkarnama
Published on
Updated on

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात भाजपच्या वतीने मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. या रॅलीत चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले, त्यांचे पती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. रॅलीदरम्यान ‘बाप तो बाप रहेगा’ या गाण्यावर दोघांनी ठेका धरला. मात्र, या सगळ्यात आमदार श्वेता महाले यांनी हातात धनुष्यबाणाचे चिन्ह दाखवल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

विशेष म्हणजे, बुलढाणा जिल्ह्यात आमदार श्वेता महाले आणि बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यात स्थानिक राजकारणावरून अनेकदा खटके उडाले आहेत. आता भाजपच्या रॅलीत श्वेता महाले यांनी धनुष्यबाणाचे चिन्ह दाखवणं अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं आहे. हे केवळ रॅलीतील उत्स्फूर्त राजकीय प्रदर्शन होतं की त्यामागे काही संदेश होता, याची चर्चा बुलढाण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

चिखलीपासून बुलढाण्यापर्यंत संघर्ष?

चिखली विधानसभा मतदारसंघात संजय गायकवाड यांच्या माध्यमातून शिवसेनेचा पक्षविस्ताराचा कार्यक्रम सुरु आहे. कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश घडवून आणले जात आहेत. यामागे संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांची २०२९ साठीची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे.

shweta mahale, vidhydhar mahale, devendra fadnavis
Maharashtra Political Live Update : मोठी बातमी: मुंबई पोलिसांनी मुंबईतील ओबीसी समाजाच्या आंदोलनाला परवानगी नाकारली

यावरून श्वेता महाले यांनी आक्षेप घेतल्याची चर्चा होती. दुसरीकडे गायकवाड यांनीही महाले यांच्यावर टीका करत चिखलीतील राजकारणावर आपला प्रभाव वाढवण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आता चिखलीतील राजकीय संघर्षाचा परिणाम बुलढाणा शहरातील महायुतीच्या समीकरणांवरही होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

shweta mahale, vidhydhar mahale, devendra fadnavis
Maharashtra News Update : देश-विदेशात काय राजकीय घाडमोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

विशेष म्हणजे, 2029 च्या विधानसभा निवडणुकीला अजून वेळ असला तरी बुलढाणा जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही घटक पक्षांमध्ये आतापासूनच राजकीय ताकद आजमावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. अशातच श्वेता महाले यांचे शक्तिप्रदर्शन आणि धनुष्यबाणाचे चिन्ह चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यामुळे श्वेता महालेंचा हा ‘पॉवर शो’ संजय गायकवाड यांच्यासाठी राजकीय संदेश आहे का? की केवळ रॅलीतील उत्स्फूर्त क्षण? याची चर्चा आता बुलढाण्यात रंगली आहे. मात्र, भाजप आणि शिवसेना महायुतीचा भाग असताना स्थानिक पातळीवरील या कुरघोड्या आगामी काळात कुठल्या वळणावर जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com