Mumbai News : राज्यातील वातावरण गेल्या आठ दिवसापासून सत्ताधारी व विरोधकाकडून एकमेकांवर केल्या जात असलेल्या टीका टिपण्णीमुळे चांगलेच तापले आहे. त्यातच रविवारी कोकण दौऱ्यांवर गेलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी संबंधित डान्सबारचे जाहीरपणे समर्थन केले आहे. त्यामुळे शिंदेंच्या या वक्तव्यानंतर आता हा सर्व प्रकार म्हणजे निर्ल्लजपणाचा कळस असून ‘जनाची नाही तर मनाची तरी बाळगा' अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी झालीच पाहिजे अशी, मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एकनाथ शिंदे यांच्या विधानावर खुलासा करावा, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. त्यामुळे काँग्रेसही आता कदम यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाली असल्याचे दिसत आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईतील कांदिवलीमध्ये ‘सावली' नावाचा डान्सबार सुरु असल्याचा दावा माजी मंत्री अनिल परब यांनी केला होता. त्यांनी या डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकला. या डान्सबारमध्ये सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे ‘एफआयआर'मध्ये नमूद केला हा डान्सबार आपल्या पत्नीचा नावाने असल्याचे सांगितले होते. त्यानंतर याची कबुली गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे वडील माजी मंत्री रामदास कदम यांनी दिली होती.
त्यामुळे विरोधकांकडून गेल्या काही दिवसापासून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. राज्यातील महायुती सरकार हे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, सत्तेला चिकटून राहण्यासाठी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार, पदाधिकारी व मंत्र्यांनीच ताळतंत्र सोडले असल्याचा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केला आहे. शिंदे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी संबंधित डान्सबारचे जाहीरपणे समर्थन केले आहे, हा निर्ल्लजपणाचा कळस असून ‘जनाची नाही तर मनाची तरी बाळगा', असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
भाजप युती सरकार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath shinde) या डान्सबारचे समर्थन कसे काय करत आहेत? हिंदुत्वाच्या विचारासाठी उठाव केला म्हणणाऱ्या शिदेंनी डान्सबारमध्ये मुली नाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते? हा कसला विकास व कोणाचा विकास आहे? यावरही प्रकाश टाकावा, असे थेट आव्हानच सकपाळ यांनी दिले.
काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्यांनी डान्सबर बोलू नये', असे म्हणणारे एकनाथ शिंदेच भाजपच्या इशाऱ्यावर कठपुतलीसारखे नाचत आहेत, असा हल्लाबोल ही त्यांनी केला. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आघाडी सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातील डान्सबारला बंदी केली होती याची एकनाथ शिंदे यांनी माहिती घ्यावी आणि मगच काँग्रेसवर बोलावे, अशा शब्दात त्यांनी शिंदेंना सुनावले.
लाखो लोकांचे संसार उद्धवस्त करणारी डान्सबार संस्कृती हवीच कशाला?, एकीकडे लाडक्या बहिणींचा भाऊ म्हणून मिरवता आणि त्याच बहिणींचे संसार मोडीत काढणाऱ्या डान्सबारचे समर्थन कोणत्या तोंडाने करता? असा सवालही या निमित्ताने सकपाळ यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.