

Mumbai News : राज्यातील राजकारण गेल्या 15 दिवसात महायुतीत झालेल्या इनकमिंगमुळे चांगलेच ढवळून निघाले आहे. गेल्या चार वर्षांपासून म्हणजेच शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे. दुसरीकडे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर महायुतीमधील भाजप, शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले आहेत. लोकसभा, विधानसभा व काही ठिकाणी जिल्हा परिषद वगळता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर तरी आता महायुतीमध्ये होत असेलल्या इनकमिंग कमी होईल, असे वाटत होते.
त्यातच 15 दिवसापूर्वी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पक्षाला मोठा धक्का दिला. त्यांनी लोकसभेतील ठाकरेंच्या सहा खासदाराना शिवसेनेत प्रवेश दिला. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापतिपदासाठी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सचिन अहिर यांना संधी दिली आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या पक्षाचे काही आमदार व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत तर्कवितर्क लावले जात असल्याने राजकारण तापले आहे. त्यामुळे एकीकडे महायुतीमध्ये इनकमिंग वाढत असतानाच राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करताना सत्ताधारी महायुतीत यापुढे कोणताही नवा राजकीय पक्ष सामील होणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या विधानामुळे येत्या काळात महायुतीमधील नव्या पक्षाच्या एन्ट्रीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी येत्या काळात महायुतीत कोणताही नवा राजकीय पक्ष घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर मंगळवारी फडणवीसांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. भाजप आता कोणत्याही नव्या पक्षाला महायुतीत सामावून घेणार नाही. आम्ही नव्या मित्रपक्षांसाठी आमचे दरवाजे बंद केले असल्याचे स्पष्ट केले आहे.
महायुतीमधील पक्षाच्या विस्तारासाठी कोणाचाही पक्ष फोडण्याचा आमचा हेतू नाही. भाजपकडून शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या सर्व चर्चा पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या चर्चा थांबल्या असल्या तरी फडणवीस यांनी केलेले हे विधान एका अर्थाने मास्टरस्ट्रोकच मानले जात आहे. त्यांच्या या विधानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोंडी झाली आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडून एकनाथ शिंदे यांनी त्यांची राज्यातील ताकद वाढविण्यावर भर दिला आहे. शिंदे यांचा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांची बार्गेनींग पॉवर चांगलीच वाढणार आहे. त्यामुळे एकीकडे भाजपमध्ये चिंतेचे वातावरण असतानाच येत्या काळात होत असलेल्या इनकमिंगला त्यांनी ब्रेक लावला आहे.
दुसरीकडे गेल्या दोन दिवसापासून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए आघाडीत येणार असल्याच्या चर्चा प्रसार माध्यमात रंगल्या आहेत. मात्र, फडणवीस यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत होणाऱ्या चर्चाना ब्रेक लागणार आहे. तर दुसरीकडे येत्या काळात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही आमदार संपर्कात असल्याच्या चर्चा शिंदे यांच्या शिवसेनेकडून केल्या जात असतानाच फडणवीस यांच्या या विधानामुळे एकनाथ शिंदेंची देखील चांगलीच कोंडी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.