

Mumbai News : केंद्रातील राजकारणात गेल्या 15 दिवसापासून वेगवान घडामोडी घडत आहेत. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका होताच पहिल्यांदा ममता बॅनर्जींचा तृणमुल काँग्रेस पक्ष फुटला. विधिमंडळात तृणमुल काँग्रेसने वेगळा पक्ष स्थापन केला. त्यानंतर लोकसभेतही 28 पैकी 20 खासदारांनी वेगळा गट स्थापन करीत ममता बॅनर्जींची साथ सोडली. त्याला आठ दिवसच उलटत नाही तोच तृणमूलच्या खासदारांमुळे कमी झालेली बार्गेनिंग पॉवर वाढवत एकनाथ शिंदे यांनी मोठा डाव टाकत महाराष्ट्राचे राजकारण 360 डिग्रीमध्ये बदलले आहे.
राज्यात गेल्या वर्षभरापासून ऑपरेशन टायगरची चर्चा होत होती. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रयत्नही सुरु होते. मात्र, त्यांना अपेक्षित आकडा गाठण्यात यश येत नव्हते. ठाकरे सेनेच्या 9 खासदारापैकी सहा खासदारांचा गट त्यांना सोबत घ्यावयाचा होता. त्यासाठी पाच जण तयार होते. मात्र, सहावा खासदार तयार होत नसल्याने अडचणी येत होत्या. राजाभाऊ वाजे व ओम राजेनिंबाळकर तयार होत नसल्याने ऑपरेशन टायगर राबविण्याबाबत अडचणी येत होत्या. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धाराशिव जिल्हयात ठाकरेंची शिवसेना बॅकफूटवर पडली. त्यामुळे ओम राजेनिंबाळकर नाराज होते. त्याशिवाय पुरेसा निधी मिळत नसल्याने स्थानिक पातळीवर काम करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे राजेनिंबाळकर यांनीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याची तयारी दर्शविल्यानंतर ऑपरेशन टायगर यशस्वी ठरले आहे.
एनडीएच्या संख्येत भर टाकून मोदी शहांच्या गुडबूकमध्ये एकनाथ शिंदे यांनी जागा केली आहे. 10 जूनच्या एनडीए बैठकीसाठी एकनाथ शिंदे आले असता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या खासदारांसोबत बैठक करीत त्याच दिवशी ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब केला होता. विशेष म्हणजे त्याची दिवशी एकनाथ शिंदे बैठकीत व त्यानंतरच्या फोटोसेशनमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शेजारीच होते. त्यामुळे मोदी-शहांच्या गुडबूकमध्ये एकनाथ शिंदे यांनी जागा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे यापूर्वी 7 खासदार होते. आता त्यामध्ये सहा खासदारांची भर पडणार असल्याने 13 खासदार झाले आहेत. त्यामुळे आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी होत असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याचे समजते. त्याची दीड-दीड वर्षांसाठी वाटणी करण्यात आली आहे. पहिले दीड वर्ष परभणीचे खासदार संजय जाधव यांना संधी मिळणार आहे तर त्यानंतर दीड वर्षांसाठी धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर यांची वर्णी लागणार असल्याचे समजते.
एकनाथ शिंदे मोठ्या भावाच्या भूमिकेत
ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार फोडल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे मोठ्या भावाच्या भूमिकेत आले आहेत. त्यांचे पूर्वीचे 7 खासदार होते. आता त्यामध्ये सहा खासदारांची भर पडणार असल्याने 13 खासदार झाले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. राज्यात भाजपचे नऊ खासदार आहेत. त्यामुळे येत्या काळात शिंदे यांच्या शिवसेनेला 2029 मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपात अधिकचा फायदा होणार आहे.
एकनाथ शिंदेंनी सहा खासदार फोडून एकाच फटक्यात राज्यातील सर्व समीकरणे बदलली आहेत. येत्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची डोकेदुखी वाढणार आहे. 2029 मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपात त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा भाजपविरुद्ध शिवसेना संघर्ष पुन्हा एकदा रंगणार असल्याने यानिमित्ताने सीएम फडणवीस यांची डोकेदुखी वाढणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.