

Mumbai News : राज्यात गेल्या आठ दिवसापासून वेगवान घडामोडी घडत आहेत. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकीकडे विलनीकरणाची चर्चा सुरु आहे तर दुसरीकडे त्यावरून शिंदे यांच्या शिवसेनेकडून टार्गेट केले जात आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व माजी मंत्री रामदास कदम यांच्यात झालेला वाद या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या आमदारांची शुक्रवारी रात्री मुंबईत बैठक बोलावल्याने त्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलनीकरणाच्या चर्चेमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता पुण्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली होती. त्यामुळे एकीकडे चर्चेना उधाण आले असतानाच आता एकनाथ शिंदे यांनी देखील शुक्रवारी संध्याकाळी रायगड जिल्ह्यातील सर्व आमदारांची नंदनवन निवासस्थानी बैठक बोलवली असल्याचे समजते. या बैठकीला रायगडमधील सर्व शिवसेनेचे आमदार बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच रामदास कदम देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत काय होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
गेल्या आठ दिवसात रामदास कदम, भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर अजित पवारांच्या अपघतावरुन गंभीर आरोप केला होता. या टीकेने महायुतीतच संघर्ष पाहायला मिळाला. आता रायगडमध्ये बोलावलेल्या बैठकीत सुनील तटकरे यांच्या विरोधात गेल्या काही दिवसांत केलेल्या तक्रारींवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
त्यासोबतच या बैठकीत जिल्हा नियोजनापासून ते इतर महत्त्वाच्या कामात तटकरे यांचा चाललेला हस्तक्षेप, यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दरेगावी मुक्कामी आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे संध्याकाळी मुंबईत आल्यानंतर ही बैठक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून रायगडमध्ये शिंदे गट आणि सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत कलह पाहायला मिळत आहे. रामदास कदम यांनी थेट सुनील तटकरे यांच्या मेहुण्याचा स्टेजवर पाणउतारा केला होता. नंतर रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
महायुतीत असतानाही तटकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना निवडणुकीत छुपी मदत केल्याचा आरोप केला होता. त्यासोबतच अजितदादांच्या अपघातात हात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. त्यानंतर तटकरे यांनी रामदास कदम यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे सुनील तटकरे यांना उमेदवारी द्यावी, यासाठी रामदास कदम यांनी प्रयत्न केल्याचा दावा मंत्री भरत गोगावले यांनी केला. त्यामुळे रायगडमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार यावरून उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.