
Mumbai News : राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर दोन महिन्यापूर्वी राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले आहे. त्यानंतर महायुतीमधील तीन ही घटक पक्षात या ना त्या कारणाने राजकीय कुरघोडी सुरु आहे. त्यामुळे सर्व काही आलबेल असल्याचे दिसत नाही. त्यातच नुकत्याच झालेल्या दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले. त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता येत्या काळात उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसापासून राज्याबाहेर शिवसेना विस्ताराचा रखडलेला प्लॅन पुन्हा सक्रिय केला आहे. येत्या काळात शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर पक्षविस्तार करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे.
चारच दिवसापूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये भाजपने (BJP) आम आदमी पक्षाचा सुफडासाफ करीत मोठा विजय मिळवला. या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला होता. हिंदुत्त्ववादी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी आम्ही उमेदवार देणार नाही. सत्ताधारी आम आदमी पक्षाचे 15 आमदार शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक होते. पण आम्ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत भाजपला पाठिंबा दिला, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यानंतर मात्र आता शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर शिवसेना वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तशास्वरूपाच्या हालचालीना वेग आला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेने (Shivsena) आता राष्ट्रीयस्तरावर ठसा उमटवण्यासाठी महाराष्ट्राबाहेर कार्यकर्त्यांची नोंदणी सुरु केली आहे. राज्यात शिवसेना आणि भाजपसोबतचे संबंध ताणले जात असतानाच शिंदेंच्या पक्षाने घेतलेला पवित्रा लक्षवेधी आहे. शिवसेना अखंड असताना पक्षविस्ताराचे प्रयत्न झाले. पण यामुळे अन्य राज्यांमध्ये हिंदुत्त्ववादी मतांची फाटाफूट होईल आणि त्याचा फटका आपल्याला बसेल, असा विचार भाजपने वेळोवेळी हे प्रयत्न हाणून पाडले. मात्र, आता पुन्हा एकदा शिवसेनेने राज्याबाहेर विस्तार करण्याचे प्रयत्न सुरु केल्याने येत्या काळात हा मुद्दा भाजपसाठी अडचणीचा ठरणार आहे.
याबाबत दोन दिवसापुर्वीच सोमवारी दिल्लीत शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीला सेनेचे आजी-माजी खासदार हजर होते. या बैठकीत पक्ष विस्ताराबद्दल सविस्तर चर्चा झाली असल्याचे समजते. त्यासोबतच राज्याबाहेर कार्यकर्त्यांनी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. शिवसेनेचा येत्या काळात देशभर विस्तार करण्यासाठी पक्षाकडून मोहीम राबविण्यात येणार आहे.
त्याकाळी शिवसेनेला उत्तर भारतात विस्तार करण्यापासून दूर ठेवण्यात भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना बाळासाहेब ठाकरेंनी राज्याबाहेरचा दौरा आखला. तेव्हा महाजन यांनी बाळासाहेबांची भेट घेतली. तुमच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली असल्याचं त्यांनी बाळासाहेबांना सांगितले. त्यानंतर बाळासाहेबांनी दौरा रद्द केला. त्यामुळे शिवसेनेचा राज्याबाहेर त्या वेळी विस्तार करण्यात आला नव्हता.
शिवसेना अखंड असताना उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशात पक्षाचे नाममात्र अस्तित्त्व होते. महाराष्ट्राबाहेर पक्षाने विधानासभेची एकमेव जागा उत्तर प्रदेशच्या अकबरपूरमध्ये जिंकली होती. पवन पांडे सेनेच्या तिकिटावर विजयी झाले. पण त्यानंतरच्या काळात त्यांनी मायावतींच्या बहुजन समाज पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर जून 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे महायुतीचे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने राज्यात पुन्हा यश मिळवले. एकनाथ शिंदे राज्यमंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आता त्यांनी प्रथमच राज्याबाहेर शिवसेनेच्या विस्तारासाठी पहिले पाउल टाकले आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.