
Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या हालचाली जोरात सुरु आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुका येत्या काळात पूर्ण करावयाच्या आहेत. त्यामुळे येत्या काळात शिंदे यांच्या शिवसेनेत बदल करण्याचे संकेत आहेत. त्यासोबतच मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेकडून नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे.
जून 2022 साली शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली होती. त्यावेळी 40 आमदार व 13 खासदार व शिवसेनेतील काही उपनेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले होते. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2023 ला शिवसेना मुख्य नेता पदावर एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. या बैठकीत, निवडणूक आयोगाने त्यांच्या गटाला नाव व चिन्ह दिल्यानंतर, शिंदे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नियुक्ती केली गेली होती.
शिवसेना पक्ष फुटीपूर्वीच्या पक्षामध्ये मुख्य नेते पदाच्यावर पक्षप्रमुख हे पद होते. मात्र शिवसेना फुटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेने पक्षप्रमुख पद निर्माणच केले नाही. शिंदेंच्या शिवसेनेत मुख्य नेतापद हेच सर्वोच्च पद असणार आहे. आणि याच पदावर 30 जूनच्या बैठकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पुन्हा एकदा नियुक्ती होणार आहे. यासोबतच या कार्यकारणीमध्ये पक्ष सचिवांच्या नियुक्तीबद्दल काही ठराव मांडले जाणार आहेत. यात सचिव पदाचे चेहरे बदलले जाण्याची दाट शक्यता आहे. नव्या सचिवपदी तरुण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जवळच्या नेत्याचा सहभाग असणार आहे.
मुंबईसाठी नवा चेहरा कोण?
मुंबई कार्यकारिणीसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून काही नव्या चेहऱ्यांचा शोध घेतला जात आहे. ही निवड युवा आणि महिला नेत्यांमधून केली जाणार आहे. काही दिवसापूर्वीच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची सूत्रे श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपवली आहेत. त्यासोबतच आता मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागामध्ये प्रभावीपणे काम करणाऱ्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीत फेरबदल
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सचिव, उपनेतेपदी येत्या काळात नवीन मंडळींना संधी दिली जाणार आहे. त्यासाठी पक्षाकडून नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. शिंदे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत दीपक केसरकर, रामदास कदम, आनंदराव अडसूळ, यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, तानाजी सावंत, विजय नाहटा आणि शिवाजी आढळराव पाटील यांना त्यावेळी स्थान देण्यात आले होते. त्यामुळे येत्या काळात काय बदल केले जाणार याची उत्सुकता लागली आहे.
कार्यकारणीमध्ये मांडले जाणार राजकीय ठराव
निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या कायदेशीर पेचात उद्धव ठाकरे अडकले. अशा प्रकारचे कायदेशीर पेच शिंदे यांच्यासमोर निर्माण होऊ नये म्हणून शिंदेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून दरवर्षी न चुकता राष्ट्रीय कार्यकारणी आयोजित करून काही महत्त्वाचे ठराव संमत केले जातात. 30 जून रोजी होणारी ही कार्यकारणी त्याचाच एक भाग आहे. संघटनात्मक पदांच्या निवडणुका, संघटनात्मक बदलाचे प्रस्ताव, या सोबतच पक्षाचे राजकीय ठराव कार्यकारणीमध्ये मांडले जातात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.